ट्रक अपघातात व्यावसायिक विवाहितेचा मृत्यू, पती, पालक, बहिणीला २२ लाख रुपये भरपाई
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: March 28, 2023 06:13 PM2023-03-28T18:13:27+5:302023-03-28T18:15:23+5:30
पीडितांनी उच्च न्यायालयात अपील दाखल करून भरपाई वाढवून मागितली होती
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने ट्रक अपघातात मृत्यू झालेल्या चंद्रपूर येथील तरुण व्यावसायिक विवाहितेचे पती, आई, वडील व बहीण यांना २२ लाख ४० हजार ५०० रुपये भरपाई मंजूर केली. न्यायमूर्ती उर्मिला जोशी यांनी हा निर्णय दिला.
मृताचे नाव मिनल खंडलोया होते. त्या केवळ २२ वर्षे वयाच्या होत्या. सॉफ्टवेयर इंजिनियर असलेल्या मिनल व्यवसायामधून वार्षिक २ लाख १० हजार रुपये आर्थिक उत्पन्न मिळवित होत्या. त्यांचा १३ मार्च २०१० रोजी अपघातात मृत्यू झाला. त्याच्या केवळ एक वर्षापूर्वी त्यांचे लग्न झाले होते. ११ जुलै २०१९ रोजी मोटर अपघात दावा न्यायाधिकरणने पती अनुज, वडील जुगलकिशोर राठी, आई लिना व बहीण स्नेहल यांना केवळ ९ लाख ४७ हजार ५०० रुपये भरपाई मंजूर केली.
त्याविरुद्ध पीडितांनी उच्च न्यायालयात अपील दाखल करून भरपाई वाढवून मागितली होती. उच्च न्यायालयाने मिनल यांचे कमी वय, आर्थिक उत्पन्न, अपघातामुळे कुटुंबियांवर झालेला मानसिक आघात इत्यादी बाबी लक्षात घेता भरपाई वाढवून दिली. अपीलकर्त्यांच्या वतीने ॲड. मोहित खजांची यांनी कामकाज पाहिले.