अभय लांजेवार
उमरेड (नागपूर) : अत्यंत आनंदात सुखी जीवनाचा प्रवास सुरू असतानाच अचानकपणे पतीचे अपघाती निधन झाले. पतीने उभारलेले स्टोन क्रेशर, सिमेंट पाईप कारखाना आता बंद पडणार. एकटी बाई काहीही करणार नाही, अशा चर्चा सुरू झाल्या. ‘ती’ डगमगली नाही. रडत बसली नाही. कारखान्यातील ‘त्या’ मजुरांचे काय होणार या विचारचक्राने ती चिंताग्रस्त झाली. धक्क्यातून सावरली आणि पती निधनाच्या अगदी सतराव्या दिवशी अतिशय अवघड आणि जोखीमेच्या स्टोन क्रशर आणि सिमेंट पाईपच्या व्यवसायात स्वत: पाऊल टाकले. मागे वळून न पाहता जिद्दीने यश मिळविले.
मागील नऊ वर्षांपासून विविध संकटाचा मुकाबला करीत या उद्योगात आपली वेगळी मोहोर उमटविणाऱ्या रणरागिणीचे नाव शीतल अरुण वांदिले आहे. अरुण वांदिले हे अभियंता होते. त्या काळातील त्यांच्या सामाजिक कार्याची आठवण आजही अनेकजण करतात. त्यांनी सुमारे २० वर्षांपूर्वी सिमेंट पोल, पाईप तसेच स्टोन क्रशरचा उद्योग उभारला. उद्योग भरभराटीस येत असतानाच २ नोव्हेंबर २०१३ ला अरुण वांदिले यांचे अपघाती निधन झाले. या दोन्ही उद्योगात शंभरावर मजुरांचा उदरनिर्वाह होता. शिवाय उद्योगाची ही ‘लाईन’ एखाद्या महिलेसाठी तारेवरची कसरत ठरणारी होती.
पतीने कष्टातून उद्योग उभारला होता. मजुरांना वाऱ्यावर सोडण्याचे काम पतीने केले नाही. मग आपण या उद्योगाला नवा आयाम द्यायचा, असा पक्का निर्धार केला. भरपूर मेहनत घेतली. रात्रंदिवस बारकाईने लक्ष दिले. यंत्रसामुग्री अपुरी होती. अनेकांचे कर्ज होते. खूप साऱ्या अडचणी होत्या.
आई सावलीसारखी पाठीशी
योग्य नियोजन आखले. इमानेइतबारे सेवाभाव जपला. मजूर वर्गाचा विश्वासही संपादन केला. आता पुन्हा सिमेंट पोल, पाईप आणि स्टोन क्रशरचे युनिट उभे करण्याची धडपड सुरू असल्याची बाब शीतल वांदिले यांनी व्यक्त केली. एक गृहिणी ते यशस्वी उद्योजिका अशा प्रवासात आई निलिमी तळेकर ही अगदी सावलीसारखी माझ्या पाठीशी होती, अशीही बाब शीतल वांदिले यांनी सांगितली. मुलगा पारस आणि रोहन यांनीही साथ दिली. अनेकांनी आत्मविश्वास वाढविला, म्हणूनच मी यशस्वी ठरू शकले,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.