लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पहाटे फिरायला जाणारे तसेच वृत्तपत्र विकणाऱ्यांना लुटणाºया तीन वेगवेगळ्या टोळ्यांचा छडा लावून त्यातील ११ जणांना ताब्यात घेण्यात गुन्हे शाखेच्या युनिट एकमधील पोलिसांनी यश मिळविले. ११ आरोपींपैकी ९ जण अल्पवयीन आहेत. त्यातील अमर अशोक खरात (वय १९, रा. श्रीकृष्णनगर, नंदनवन) आणि मिलिंद प्रेम हिराणी (वय १९, रा. श्रीनगर, अजनी) या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून लुटमार, मंदिरातील दानपेट्या तसेच वाहन चोरीचे एकूण १० गुन्हे उघडकीस आले आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी आज पत्रकारांना दिली. एका टोळीचा सूत्रधार आरोपी करण गाडगीलवार (वय १९) सध्या बुटीबोरी परिसरातील एका गुन्ह्यात कारागृहात आहे.आरोपी अनेक महिन्यांपासून चोरी-लुटमारीत सक्रिय आहेत. ते रात्री २ ते पहाटे ५ या वेळेत चोरी-लुटमारीचे गुन्हे करतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी वर्तमानपत्र विक्रेत्यांना लुटण्याचा सपाटा लावला होता. त्यामुळे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या पदाधिकाºयाने पोलीस आयुक्तांना निवेदन सादर करून आरोपींना पकडण्याची विनंती केली होती. त्यानुसार, गुन्हे शाखेचे उपायुक्त नीलेश भरणे यांनी रात्रीच्या वेळी हैदोस घालून चोरी-लुटमारी करणाऱ्यांच्या मुसक्या बांधण्यासाठी गुन्हे शाखेची अनेक पथके कामी लावली होती. त्यातील युनिट एकच्या पथकाने घटनास्थळाजवळच्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. त्यानुसार धंतोली, अजनी, बेलतरोडी परिसरात तब्बल ७२ तास सलग शोधमोहिम राबवून आरोपींचा छडा लावला. हे एकूण १२ गुन्हेगार तीन वेगवेगळ्या टोळ्यांचे सदस्य असल्याचे चौकशीत समोर आले असून, १२ पैकी ९ आरोपी अल्पवयीन असल्याचेही स्पष्ट झाले. त्यांनी एकूण १० गुन्ह्यांची कबुली दिल्याचे उपायुक्त भरणे यांनी पत्रकारांना सांगितले. यात प्रतापनगरातील एक लुटमार, मंदिरातील चोरीचे सहा तसेच दुचाकी चोरीच्या तीन गुन्ह्यांचा समावेश असल्याचेही ते म्हणाले. पोलीस निरीक्षक संतोष खांडेकर, सहायक निरीक्षक प्रशांत चौगुले, गोरख कुंभार, वसंत चौरे, देवीप्रसाद दुबे, राजेंद्र सेंगर, सुनील चौधरी, आशिष ठाकरे, अमित पात्रे, मनीष पराये, सुशील श्रीवास, राहुल इंगोले आणि मंगेश मडावी यांनी ही कामगिरी बजावल्याची माहिती त्यांनी दिली. पत्रकार परिषदेला सहायक आयुक्त सुधीर नंदनवार उपस्थित होते.मैत्रिणींना प्रभावित करण्यासाठी गुन्हेपोलिसांनी ताब्यात घेतलेल्या बहुतांश आरोपींना हुक्का तसेच महागड्या सिगारेट पिण्याचे व्यसन आहे. हे व्यसन भागविण्यासाठी तसेच मैत्रिणींवर पैसे उधळून त्यांना प्रभावित करण्यासाठी आरोपींनी चोरी-लुटमारीचा मार्ग निवडला. अल्पवयीन असले तरी अनेक आरोपींवर यापूर्वीचे सुद्धा गुन्हे दाखल आहेत.नाईट पेट्रोलिंगचा फंडारात्रीच्या गर्द अंधारात चोरी करायला निघण्यापूर्वी ते आपसात मोबाईलवर बोलताना आज नाईट पेट्रोलिंग करने जाना है, असे म्हणत होते. आधी ते आपल्या दुचाकीसाठी पेट्रोल चोरायचे. मंदिरातील दानपेटी चोरायचे. यावेळी त्यांना मंदिराच्या आजूबाजूला एखादी दुचाकी आढळल्यास हे चोरटे ती दुचाकी घेऊन रात्रभर फिरायचे आणि पहाटेच्या वेळी ती दुचाकी जिथल्या तिथे आणून सोडायचे, असा त्यांचा फंडा होता.