नागपूर : कारमधून चंद्रपूरमार्गे नागपूर येथे अवैधरीत्या गांजा तस्करी करणाऱ्या दाेन आराेपींना बुटीबाेरी पाेलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सात लाख ४७ हजार ८०० रुपये किमतीच्या ७० किलाे ७८० ग्रॅम गांजासह एकूण १४ लाख ५६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई चंद्रपूर - नागपूर महामार्गावरील बुटीबाेरी वाय पाॅइंट येथे बुधवारी (दि. २९) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास करण्यात आली.
पवन राजकुमार कश्यप (२६, रा. शिवविहार, करावलनगर, दिल्ली) व दीपक मनीराम शर्मा (२७, रा. गल्ली नं. ४, बच्चन सिंह काॅलनी, मुजफ्फरनगर, उत्तर प्रदेश) अशी अटकेतील आराेपींची नावे आहेत. चंद्रपूरमार्गे नागपूरकडे गांजाची तस्करी केली जात असल्याची गुप्त सूचना बुटीबाेरी पाेलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे त्यांनी बुटीबाेरी वाय पाॅइंट परिसरात नाकाबंदी सुरू केली हाेती. दरम्यान, चंद्रपूरहून नागपूरकडे जात असलेल्या कारला (क्र. एचआर ५५ एई २४७०) थांबवून वाहनाची झडती घेतली असता, कारच्या सिटखाली जागा बनवून गांजा लपवून त्यावर मास्क व सॅनिटायझर ठेवलेले आढळून आले. ही अवैध गांजा तस्करी असल्याचे पंचासमक्ष केलेल्या चाैकशीत स्पष्ट हाेताच पाेलिसांनी दाेन्ही आराेपींना ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून सात लाख ४७ हजार ८०० रुपये किमतीचा ७४ किलो ७८० ग्रॅम गांजा, सात लाखांची कार, दाेन हजार रुपयांचे मास्क व सॅनिटायझर आणि सात हजारांचा माेबाइल हॅण्डसेट असा एकूण १४ लाख ५६ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी आराेपींविरुद्ध गुन्हा नाेंदवून दाेघांना अटक केली आहे. ही कारवाई पाेलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अपर पाेलीस अधीक्षक राहुल माकणीकर, उपविभागीय पाेलीस अधिकारी पूजा गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पाेलीस निरीक्षक ओमप्रकाश काेकाटे, सहायक पाेलीस निरीक्षक सतीश साेनटक्के, उपनिरीक्षक आशिष माेरखेडे, व्यंकटेश दानाेडे, मिलिंद नांदूरकर, संजय बांते, राजू कापसे, विवेक गेडाम, पंकज ढाेणे, ओम राठाेड, विनायक सातव यांच्या पथकाने केली.