लोकमत न्यूज नेटवर्क
बुटीबोरी : शहराची लाेकसंख्या ८५ हजार असताना येथे एकमेव काेराेना प्रतिबंधक लसीकरण केंद्र देण्यात आले आहे. शहरातील शासकीय आयटीआयमध्ये असलेल्या या केंद्रात किमान ४०० ते ५०० नागरिक लस घेण्यासाठी सकाळी ६ वाजतापासून रांगा लावतात. त्यांना सकाळी १०.३० वाजता टाेकन दिले जाते. लस घेण्यास इच्छुक असणाऱ्यांची संख्या व लसींचा साठा यात ताळमेळ नाही. नियाेजनाचा अभाव तसेच पुरेशा लसींचा पुरवठा नियमित केला जात नसल्याने या केंद्राला लसीची गरज आहे.
काेराेना प्रतिबंधक लस मिळावी म्हणून नागरिक सकाळी ६ वाजतापासून केंद्रावर रांगा लावायला सुरुवात करतात. कर्मचारी त्यांना सकाळी १०.३० वाजतापासून टाेकन द्यायला सुरुवात करतात. जेवढ्या लसी तेवढे टाेकन दिले जात असल्याने, इतरांना टाेकन न मिळाल्याने परत जावे लागते. टाेकन आधी मिळावे म्हणून नागरिक सकाळपासूनच रांगा लावायला सुरुवात करतात. टाेकन घेतल्यानंतर काही जण घरी जाऊन नाश्ता-जेवण करून येतात. काही जण मात्र उपाशीच थांबतात. टाेकन जर आधी दिले तर हा त्रास वाचणार असल्याचेही ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले.
मी लस घेण्यासाठी सकाळी ९ वाजता (शुक्रवार, दि. २३) आलाे. दाेन तासापासून रांगेत उभा आहे. पण टाेकन मिळाले नाही, अशी प्रतिक्रिया पंढरी चौधरी (७४, रा. सातगाव, बुटीबोरी) यांनी व्यक्त केली. या रांगेत आपण सकाळी ९.३० वाजतापासून उभे असल्याचे कन्हाळगाव (सातगाव) येथील ७० वर्षीय इंदूबाई मधुकर नेवारे यांनी सांगितले. ही समस्या साेडविण्यासाठी लसीकरण केंद्रासाेबतच लसींचा पुरवठा वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
...
ज्येष्ठांना दुसऱ्या डाेसची प्रतीक्षा
शहरातील बहुतांश ज्येष्ठ नागरिकांना काेराेना प्रतिबंधक लसीचा पहिला डाेस घेऊन ८४ दिवस पूर्ण झाले आहेत. त्यामुळे ते दुसरा डाेस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर येतात आणि टाेकन न मिळाल्याने परत जातात. हे केंद्र ज्या दिवशी लस उपलब्ध हाेईल, त्याच दिवशी सुरू असते. लस साठा उपलब्ध न झाल्यास केंद्र दाेन ते तीन दिवस बंदच असते. या केंद्रावर १०० ते ३०० लसींचा साठा पुरविला जात असून, लस घेणाऱ्यांची संख्या ४५० ते ५०० असते. यात दुसरा डाेस घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागताे.
...
शुक्रवारी (दि. २३) ३०० लस उपलब्ध झाल्या. यात दुसरा डाेस घेणाऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाते. केंद्रावर गर्दी हाेऊ नये म्हणून टाेकन पद्धतीचा अवलंब केला आहे.
- डॉ. शिल्पा घुगे,
समुदाय आरोग्य अधिकारी, बुटीबोरी.
230721\img_20210723_104030.jpg
लसीकरण करण्यासाठी रांगेत उभे असलेले नागरिक