प्रकाश गजभिये : उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत सरकारला तूर भेट नागपूर : नापिकी, गारपीट व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तब्बल अडीच वर्षापासून न मिळाल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांची तूर सहा हजार रुपये प्रति क्विंटल भावाने सरकारने त्वरित खरेदी करावी, अशी मागणी महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी उपविभागीय अधिकारी अविनाश कातडे, मौदा तहसीलदार नीलेश कदम, रमेश पागोटे यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन केली. विशेष म्हणजे सरकारसाठी २० किलो तूर भेटस्वरूपात पाठविण्यात आली.तुरीचे उत्पादन झाले असतानाही भाजप सरकारने विदेशातून १० लाख टन तूर खरेदी करून व्यापाऱ्यांचा फायदा केला आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यात अपयशी ठरलेल्या भाजप सरकारने २२ एप्रिलपर्यंत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचीच तूर खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याने कर्जबाजारी होऊन तुरीचे पीक लावलेल्या लाखो शेतकरी कुटुंबावर पुन्हा आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी शेतकरी कर्जमाफीसाठी संघर्षयात्रा काढली. पहिला, दुसरा आणि तिसरा टप्पा झाल्यावरही सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही उलट भाजपा संवाद यात्रा काढायला निघाली आहे, हा शेतकऱ्यांवर अन्याय असल्याची टीका गजभिये यांनी केली. शिष्टमंडळात बाबा गुजर, बंडू वैरागडे, आशू शेख, हरिभाऊ कुंभलकर, प्रणव सहारे, विक्की वैद्य, खुशाल सिंगनजुडे, बंडू बागडे, विजय सोनकुसरे आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)
सहा हजार रुपये क्विंटलप्रमाणे तूर खरेदी करा
By admin | Published: May 02, 2017 1:58 AM