लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लालपरीला सुगीचे दिवस आल्याचे बोलले जात असताना आणि एसटी महामंडळाच्या उत्पन्नात मोठी वाढ झालेली असताना महामंडळाचे पदाधिकारी 'जुन्या मोड'वर आले आहे. आता त्यांनी प्रवाशांना शिस्त लावण्याचे प्रयत्न चालविले आहे. या पार्श्वभूमीवर, आधी तिकिट घ्या, नंतरच बसमध्ये चढा, अशी पद्धत एसटीने सुरू केली आहे.
अलिकडे एसटीच्या बसेसमधील प्रवाशांची गर्दी चांगलीच वाढली आहे. सर्वच मार्गावरच्या बसेस प्रवाशांनी भरून धावत असल्याचे सध्याचे चित्र सर्वत्र दिसून येते. अर्थात प्रवासी वाढल्याने एसटी महामंडळाच्या उत्पन्नातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे की काय, एसटी महामंडळाने आता प्रवाशांना शिस्त लावण्याचा प्रकार अवलंबिला आहे. या पार्श्वभूमीवर, एसटीच्या सर्व आगार प्रमूख, विभाग प्रमुखांना महामंडळाकडून एक पत्र मिळाले आहे. त्या पत्रातून 'ईशू अॅन्ड स्टार्ट'ची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
काय आहे 'ईशू अॅन्ड स्टार्ट' ?बस स्थानकाच्या फलाटावर बस लागताच प्रवाशांनी रांगेत लागून वाहकापासून एक एक करून आधी तिकिट घ्यायचे. नंतरच बसमध्ये प्रवास करायचा, असा 'ईशू अॅन्ड स्टार्ट'चा अर्थ आहे. असे केल्याने कोणताच प्रवासी विनातिकिट बसमध्ये चढू शकणार नाही आणि फुकट्या प्रवाशांमुळे होणारे नुकसानही होणार नाही. त्याचप्रमाणे बसवाहकांना विनातिकिट प्रवासी वाहतूक करण्याचा गैरप्रकार करता येणार, नसल्याचा तर्क महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी काढला आहे.
प्रकार अंगलट येण्याची भीती
एसटी महामंडळाने काढलेला हा आदेश तसा २०२० चाच आहे. मात्र, प्रवाशांच्या सोयीसाठी त्याची अंमलबजावणी केली जात नव्हती. आता सोमवारी २६ ऑगस्ट २०२४ पासून त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे आदेश वाहकांना देण्यात आले आहे. दरम्यान, रांगेत राहून तिकिट घ्या आणि नंतर बसमध्ये चढा, हा प्रकार प्रवाशांना पचणारा नाही. त्यामुळे एसटीकडे प्रवासी पाठ फिरवू शकतात आणि महामंडळाच्या हा प्रकार अंगलट येऊ शकतो, अशी भीती एसटीचे अधिकारी, कर्मचारी आणि कामगार संघटनेचे पदाधिकारी खासगीत व्यक्त करीत आहेत.