नागपूर : बिघडलेली जीवनशैली व वाढता तणाव, यामुळे हृदयविकाराचे प्रमाण वाढते आहे. २०३० मध्ये एकूण मृत्युंपैकी ३२.५ मृत्यू हे हृदयविकाराने होतील व ही संख्या सुमारे २.४२ कोटी इतकी असेल. सद्यस्थितीत मृत्युंची टक्केवारी ३१.५ टक्के असून, २४.२ टक्के मृत्यू हृदयाशी संबंधित आजारामुळे होतात. ‘इंडियन सायन्स काँग्रेस’मध्ये झालेल्या वैज्ञानिक सत्रादरम्यान ‘इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी’च्या प्रोफेसर डॉ. वंदना पत्रावळे यांनी ही माहिती दिली.
हृदयविकाराचे प्रमाण वाढत असल्याने त्यावरील खर्चही वाढत आहे. एका अंदाजानुसार, हृदयाशी निगडित असलेल्या आजारांवरील एकूण खर्च हा काही वर्षांतच अडीचशे अब्ज डॉलर्सवर पोहोचू शकतो, तर हार्टअटॅक आल्यावर ११.५ अब्ज डॉलर्स खर्च होतील. तंत्रज्ञानामुळे यावरील उपचाराचा खर्च मात्र घटला असून, स्टेंट्सच्या किमती कमी झाल्या आहेत. दीड लाखाला मिळणारे स्टेंट्स आता २० ते २५ हजारांत मिळत आहेत. २०२७ पर्यंत स्टेंट्सची बाजारपेठ ८.३ अब्ज डॉलर्सचा आकडा गाठू शकते. यात उत्तर अमेरिकेचा वाटा सर्वात जास्त असेल, तर आशिया खंड तिसऱ्या क्रमांकावर असेल, असे डॉ. पत्रावळे यांनी सांगितले.
सुमारे ९६ टक्के प्रकरणांमध्ये स्टेंट्सचा वापर करण्यात येतो. ‘ड्रग एल्युटिंग स्टेंट्स’च्या वापरामुळे अनेक सकारात्मक बदल घडले असून, मेटॅलिक स्टेंट्सचे तोटे दूर झाले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘बायोडिग्रेडेबल स्टेंट्स’वर सखोल संशोधन हवे
‘बायोडिग्रेडेबल स्टेंट्स’चा उपयोग करण्यात येतो. मात्र, या स्टेंट्सच्या जागेवर काही काळाने परत ब्लॉकेजची समस्या होऊ शकण्याचा धोका असतो. त्यामुळे संबंधित स्टेंट्स ‘बायोडिग्रेड’ झाल्यावरही संबंधित धमणी सुस्थितीत राहिली पाहिजे, या दृष्टीने संशोधन सुरू आहे व अशा स्टेंट्सचे प्राथमिक निरीक्षणे सकारात्मक आली आहेत, असे त्यांनी सांगितले.