नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ मध्ये त्यांच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात गगनयान मिशनची घोषणा केली होती. २०२२ मध्ये ते साध्य करण्याचे तात्पुरते लक्ष्य होते. मात्र कोरोना महामारीमुळे विलंब झाला. देशातील तंत्रज्ञानाने निर्मित या अंतराळ यानाचे सखोल चाचण्यांनंतरच २०२३च्या शेवटी प्रक्षेपण होईल, अशी माहिती ‘इस्रो’चे चेअरमन डॉ. एस. सोमनाथ यांनी दिली. ‘इंडियन सायन्स कॉंग्रेस’साठी नागपुरात आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
‘चांद्रयान-३’ मोहिमेची तयारी पूर्ण झाली असून, सेफ लॅण्डिंग व रोव्हरवर आमचा भर राहणार आहे. ‘चांद्रयान-२’मधील उणिवांपासून धडा घेत भारताचे शास्त्रज्ञ या मोहिमेत परिश्रमपूर्वक काम करत आहेत. चांद्रयान-२चा ऑर्बिटर चांद्रयान-३ मिशनमध्ये वापरला जाईल. ते खूप फायदेशीर ठरेल. जुलैच्या जवळपास ‘चांद्रयान-३’ झेपावेल, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.
लवकरच अंतराळ धोरणाची घोषणा
बदलत्या तंत्रज्ञानामुळे येणारा काळ हा अंतराळ क्षेत्राचा राहणार आहे. भारताने यादृष्टीने पावले उचलायला सुरुवात केली आहे. भारताच्या अंतराळ धोरणाच्या पहिल्या मसुद्यावर मागील वर्षी चर्चा झाली होती. हा मसुदा आता पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविला आहे. लवकरच या धोरणाची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. अनेक खासगी संस्थादेखील अंतराळ क्षेत्रात काम करत आहेत. नवीन धोरणामध्ये अंतराळातील व्यावसायिक खासगी सहभागावर भर राहणार आहे. केंद्र सरकार यासाठी अनुकूल आहे. खासगी क्षेत्राला प्रोत्साहन दिल्याने भारतीय अंतराळ क्षेत्र जागतिक अंतराळ बाजारपेठेत स्पर्धात्मक राहण्यास सक्षम होईल. तसेच त्यामुळे अवकाश आणि इतर संबंधित क्षेत्रांमध्ये अनेक रोजगार निर्माण होतील, असे त्यांनी सांगितले.
अंतराळ कचऱ्याचे व्यवस्थापन आवश्यक
अंतराळ कचरा ही मोठी समस्या आहे. त्याचे व्यवस्थापन आणि उपायांसाठी वेगवेगळे उपाय सुचवले जात आहेत. अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन संस्थेने दिलेल्या माहितीनुसार अवकाश कचऱ्याचे वीस हजार तुकडे असून, त्यात अग्निबाणांचे सुटे भाग, निकामी उपग्रह व इतर वस्तूंचा समावेश आहे. कचऱ्याच्या रूपातील कोट्यवधी निरूपयोगी वस्तू अवकाशात फिरत आहेत. याचे व्यवस्थापन आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
चंद्राच्या भूपृष्ठाखालील तापमानावर संशोधन होणार
‘चांद्रयान-२’ प्रमाणेच ही मोहीम राहणार असली तरी त्यात काही विशिष्ट बाबींवर भर देण्यात येणार आहे. चंद्राचा भूपृष्ठ हा ‘थर्मली कोटेड’ असल्याचे मानण्यात येते. या मोहिमेत भूपृष्ठाखालील तापमानावर संशोधन होणार असून, तसे नमुने गोळा करण्यात येणार असल्याची माहिती भारत सरकारच्या ‘पीआरएल’चे (फिजिकल रिसर्च लेबॉरेटरी) संचालक प्रा.अनिल भारद्वाज यांनी दिली. ‘चांद्रयान-३’ मोहिमेदरम्यान लॅण्डिंग हे चंद्राच्या ध्रुवाजवळ करण्यात येणार आहे. भारत असे करणारा पहिलाच देश ठरेल, असे त्यांनी सांगितले.
‘आदित्य-१’ चा मुहूर्त २०२३ मध्येच
सूर्याच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी ‘इस्रो’कडून ‘आदित्य-१’ हे मिशन राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत पृथ्वी व सूर्याच्या सरळ रेषेतील एल-१ या बिंदूचा अभ्यास करण्यात येईल. हे यान याच वर्षी मार्च महिन्याच्या जवळपास प्रक्षेपित होण्याची शक्यता आहे. या मिशनअंतर्गत सूर्याची उष्णता, सौरवादळे, सौरवाऱ्यांचे तापमान व प्रवाह आदींचा अभ्यास करण्यात येईल. याशिवाय ‘इस्त्रो’कडून शुक्र ग्रहाचादेखील अभ्यास करण्याची तयारी सुरू आहे, असे भारद्वाज यांनी सांगितले.