लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - कोरोनाच्या भीतीमुळे पोलिसांकडून ब्रेथ ॲनालायझरच्या माध्यमातून केली जाणारी ड्रंक न ड्राईव्ह कारवाई थंडावल्याने तळीराम झोकात आले होते. मात्र, वाहतूक पोलिसांनी ब्रेथ ॲनालायझरला बायबाय करून आत्मनिर्भर अभियान राबवित तळीरामांना दणका दिला. मार्च ते डिसेंबर २०२० मध्ये ५७२१ तळीरामांवर पोलिसांनी कारवाई केली.
तळीराम मद्यधुंद होऊन वाहन चालवितात. त्यामुळे अपघाताचा धोका जास्त वाढतो. अपघातात मद्यधुंद वाहनचालकाचे जे नुकसान होईल ते होईल; मात्र दोष नसताना त्याच्यामुळे दुसऱ्या निर्दोष व्यक्तीला गंभीर दुखापत होते. प्रसंगी कुणाचा जीवही जातो अन् त्याच्या कुटुंबीयांना आयुष्यभर सलणारी जखम होते. त्यामुळे दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून ड्रंक न ड्राईव्हची कारवाई केली जाते. २०२० मध्ये कोरोनाने अवघे जनजीवन विस्कळीत करून सोडले होते. सर्वत्र हाहाकार, दहशतीचे वातावरण असताना याही काळात तळीराम झोकात होते. सरकारने बार आणि वाईन शॉपवर टाळे लावले असले, तरी आत्मनिर्भरतेचे भान राखत तळीरामांनी ‘गावठी’वर वेगवेगळे प्रयोग करून नशा भागविणे सुरूच ठेवले होते.
घरबाहेर पडण्यास मनाई असतानादेखील तळीराम गावठीची किक लावून सुसाट वेगात वाहने चालविताना दिसत होते. शहर पोलिसांनी त्या काळात अशा तळीरामांना वठणीवर आणण्यासाठी आपली मोहीम सुरूच ठेवली. सर्वसामान्य माणूस एकमेकांच्या संपर्कात येण्याचे टाळत होता. पोलीस मात्र धोका पत्करून तळीरामांना वठणीवर आणण्याचे काम करीत होते. संशयास्पद पद्धतीने नशेत वाहन चालविणारा नजरेस पडताच त्याचा विशिष्ट अंतरावरूनच अंदाज काढत होते. जवळ आल्यावर त्याच्या तोंडातून गावठीचा (मोहाची दारू) भपका आला की त्याच्यावर ड्रंक न ड्राईव्ह (डीडी)ची कारवाई करून दंडाची रक्कम वसूल करीत होते.
---
कोरोना इफेक्ट
विशेष म्हणजे, १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० या संपूर्ण वर्षभरात नागपुरात डीडीच्या एकूण कारवाईची संख्या ५३, ०१६ होती. यातून तळीरामांकडून १ कोटी, ४५ लाखांचा दंड वसूल करण्यात आला होता.
२०१९ मध्ये ही संख्या १९९०६ जास्त होती. तर, कोरोना इफेक्टमुळे मे ते डिसेंबर २०२० या कालावधीत कारवाईचा हा आकडा केवळ ५७२१ होता.
---
परिस्थिती कोणतीही असू दे, कोरोनाचा धोका लक्षात घेता ब्रेथ ॲनालायझरचा वापर टाळण्यात आला, तरी दारूड्या वाहचालकांवर कारवाईसाठी मागेपुढे पाहिले जाणार नाही. अनेकदा संशयास्पद वाहनचालकाच्या रक्ताचे नमुने (त्याने नशा केली की नाही, ते बघण्यासाठी) घेतले जातात.
सारंग आवाड ()
पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा, नागपूर.
---