लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या प्रभाग १२(ड)मधील पोटनिवडणुकीचा प्रचार मंगळवारी संपला. आता उमेदवार घरोघरी संपर्क साधत आहेत. उद्या गुरुवारी ९ जानेवारीला मतदान होणार आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचा धक्का बसल्याने महापालिकेतील सत्ताधारी भाजप व काँग्रेस यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी हा प्रभाग आपल्यापक्षाकडे राहावा, यासाठी मोर्चेबांधणी केली असल्याने सर्वांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.या प्रभागात ५८१६२ मतदार असून यात ३००२५ पुरुष तर २७९२७ महिला मतदारांचा समावेश आहे. प्रचारतोफा थंडावल्याने उमेदवारांनी आता घरोघरी प्रचारावर भर दिला आहे. जगदीश ग्वालबन्शी यांच्या निधनामुळे या प्रभागात पोटनिवडणूक होत आहे. ही जागा कायम राखण्यासाठी भाजपने विक्रम जगदीश ग्वालबन्शी यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने माजी नगरसेवक सुरेंद्र शुक्ला यांचे पुत्र पंकज शुक्ला यांना मैदानात उतरवले आहे. या प्रभागातून पाच उमेदवार मैदानात असले तरी, खरी लढत शुक्ला व ग्वालबन्शी यांच्यातच होण्याची शक्यता आहे.या प्रभागात उत्तर भारतीय व हिंदी भाषिक मतदार मोठ्या प्रमाणात असल्याने काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांनी उत्तर भारतीय उमेदवाराला मैदानात उतरवले आहे. परंतु या प्रभागात मराठी भाषिक मतदारही मोठा प्रमाणात असल्याने त्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. भाजप महापालिकेतील १०८ चा आकडा कायम राखण्यासाठी तर हा आकडा कमी करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली आहे.निवडणुकीत अशोक देवराव डोर्लीकर (अपक्ष), विक्रम ग्वालबंशी (भाजप), आकाश सुरेश कावळे (आम आदमी पार्टी), पंकज सुरेंद्र शुक्ला (काँग्रेस) आणि प्रफुल देवराव गणवीर (भारिप बहुजन महासंघ) असे पाच उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत.