लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या प्रभाग १२(ड)मधील पोटनिवडणुकीत महापालिकेतील सत्ताधारी भाजप व काँग्रेस यांनी प्रतिष्ठेची केली आहे. जगदीश ग्वालबन्शी यांच्यामुळे या प्रभागात भाजपचा हमखास विजय होत होता. ही जागा कायम राखण्यासाठी भाजपने विक्रम जगदीश ग्वालबन्शी यांना उमेदवारी दिली आहे. विधानसभा निवडणुकीतील विजयामुळे कार्यकर्त्यांत उत्साह निर्माण झालेल्या काँग्रेसने माजी नगरसेवक सुरेंद्र शुक्ला यांचे पुत्र पंकज शुक्ला यांना मैदानात उतरवले आहे. या प्रभागातून पाच उमेदवार मैदानात असले तरी, खरी लढत शुक्ला व ग्वालबन्शी यांच्यातच होण्याची शक्यता आहे.महापालिका निवडणुकीत या प्रभागातून भाजप व काँग्रेसचे प्रत्येकी दोन नगरसेवक निवडून आले होते. यात भाजपचे जगदीश ग्वालबन्शी तर काँग्रेसचे हरीश ग्वालबन्शी यांचा समावेश होता. पक्ष वेगवेगळे असले तरी पडद्याआड ग्वालबन्शी कुटुंब एकत्र होते. या निवडणुकीत हरीश ग्वालबन्शी काँग्रेससाठी रोखठोक भूमिका घेणार की पडद्याआड कुटुंबातील उमेदवाराला मदत करणार, असा प्रश्न मतदारांना पडला आहे.विक्रम ग्वालबन्शी यांना जगदीश ग्वालबन्शी यांच्या निधनामुळे सहानुभूती मिळेल, अशी भाजप नेत्यांना आशा आहे. तर पंकज शुक्ला यांचे वडील गतकाळात नगरसेवक होते. तसेच त्यांनी यापूर्वी महापालिकेची निवडणूक लढविली होती. या प्रभागात उत्तर भारतीय व हिंदी भाषिक मतदार मोठ्या प्रमाणात असल्याने काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांनी उत्तर भारतीय उमेदवाराला मैदानात उतरवले आहे. परंतु या प्रभागात मराठी भाषिक मतदारही मोठा प्रमाणात आहेत. दोन्ही पक्षांनी मराठी उमेदवाराला नाकारल्याने मराठी भाषिकात नाराजी आहे. या नाराजीचा फायदा घेण्यासाठी अपक्ष उमेदवार अशोक देवराव डोर्लीकर यांनी मोर्चेबांधणी चालविली आहे. मराठी भाषिकचा त्यांना पाठिंबा मिळाल्यास निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. युगल किशोर विदावत यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. तर रिजवान नसीर खान यांनी उमेदवारी मागे घेतली आहे. यामुळे आता निवडणुकीत पाच उमेदवार आहेत.निवडणुकीत अशोक देवराव डोर्लीकर (अपक्ष), विक्रम ग्वालबंशी (भाजप), आकाश सुरेश कावळे (आम आदमी पार्टी), पंकज सुरेंद्र शुक्ला (काँग्रेस) आणि प्रफुल देवराव गणवीर (भारिप बहुजन महासंघ) असे पाच उमेदवार रिंगणात आहेत. शुक्रवारी चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. ९ जानेवारीला मतदात तर १० जानेवारीला मतमोजणी होणार आहे.