दीपक गिरधर रामटेकरामटेकच्या खिंडसी आणि नवेगाव खैरीच्या पेंच जलाशयात उद्या (दि. १५) ‘सी प्लेन’ उतरणार आहे. विदर्भात पहिल्यांदाच पाण्यात विमान उतरण्याचा प्रयोग साकार होणार आहे. खिंडसी जलाशयाच्या घंटेश्वरजवळ सकाळी १०.३० वाजता हे विमान उतरविण्यात येणार आहे. नागपूर विमानतळावरून सदर विमान १०.१० मिनिटांनी उड्डाण घेईल आणि अवघ्या २० मिनिटात रामटेकच्या खिंडसी जलाशयात लॅन्ड होईल. १०.४५ वाजता खिंडसीतून उड्डाण भरून ते ११.०० वाजता नवेगाव खैरीच्या पेंच (वेध) प्रकल्पात उतरणार आहे. जगात कॅनडा, श्रीलंक ा यासारख्या देशांकडे पाण्यात उतरणारी हजारो विमाने आहेत. भारत मात्र या क्षेत्रात फार मागे आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र पर्यटन विभाग आणि विमान सेवा पुरविणारी मेहर(मेरी टाईम एनर्जी हेली एअर सर्व्हिसेस) कंपनीमध्ये करार झाला. देशात जमीन ते हवाई वाहतूक ही फार खर्चिक आहे. यासाठी विमानतळांचा खर्च फार मोठा आहे. परंतु सी प्लेन पाण्यात उतरत असल्यामुळे विमानतळांचा खर्च मुळीच राहात नाही.आपल्याकडे सर्व धरणे ही सरकारच्या अखत्यारित आहे. त्यामुळे तेथे प्लेन उतरविण्याची परवानगी मिळणे कठीण होते. परंतु या करारामुळे ते शक्य झाले आहे. रामटेकच्या खिंडसी तलावात ‘सी प्लेन’ उतरविले जात आहे ती त्याची ट्रायल उड्डाण आहे. पुढे महिभरानने ही विमानसेवा नियमितपणे सुरू होण्याची शक्यता आहे. या विमानसेवेमुळे विदेशी पर्यटकांना सुविधा होणार आहे. त्यांच्या वेळेची बचत होऊन हवाई मार्गाने त्यांना जवळून रामटेक परिसराचे निसर्ग दर्शन कमी वेळात घडेल. शिवाय पेंच टायगर प्रोजेक्टमधील कर्माझरी येथे जाण्याकरिता यापुढे रस्त्याने प्रवास करण्याची आवश्यकता राहणार नाही. त्यामुळे पर्यटकांना होणारा त्रास वाचेल. पर्यटकांना कुवारा भिवसेन येथे सी प्लेनने उतरून पुढे बोटने कर्माझरीकडे कमी वेळात जाता येईल. पेंच जलाशयात याअगोदरच बोटिंग सुविधा सुरू करण्यात आली आहे. सदर सी प्लेनमध्ये नऊ प्रवाशांना प्रवास करता येणार असून प्लेनमध्ये दोन पायलट राहणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच ही सेवा सुरू करता आली असती. मात्र निवडणुकीमुळे विलंब झाला. अन्यथा देशात सर्वात आधी सी प्लेन उतरविण्याचा मान खिंडसी जलाशयाला मिळाला असता. सध्या अशाप्रकारची सेवा मुंबई ते प्रवरा जलाशय आणि मुंबई ते लोणावळा येथे सुरू करण्यात आली आहे. लवकरच ही सेवा मुंबई ते नाशिक अशीदेखील सुरू होणार आहे.
खिंडसी जलाशयात उतरणार ‘सी प्लेन’
By admin | Published: November 15, 2014 2:47 AM