नागपूर : चार कोटी रुपयाची अफरातफर केल्याचा आरोप असलेले सीए अनुप चारुदत्त सगदेव यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. न्या. एम. एस. कुलकर्णी यांनी हा निर्णय दिला.
एका महाविद्यालयाचे निवृत्त विभाग प्रमुख किशोर वाघमारे (७१) यांच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी अनुप सगदेव यांच्याविरुद्ध भादंवि कलम ४०६ व ४२० अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. वाघमारे अंकुर लॉजिस्टिक नावाने कंपनी संचालित करीत होते. या कंपनीचा लेखा व्यवहार सांभाळण्यासाठी अनुप सगदेव यांचे वडील चारुदत्त सगदेव यांच्या कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती.
दरम्यान, वाघमारे यांनी २००० मध्ये अंकुर लॉजिस्टिक कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला होता, पण अनुप सगदेव यांनी त्यांना कंपनी बंद करू दिली नाही. त्यानंतर २५ फेब्रुवारी २०१७ रोजी वाघमारे यांना आयकर विभागाची नोटीस मिळाली. त्यामधून त्यांना सगदेव यांनी या कंपनीद्वारे ३ कोटी ९९ लाख ९० हजार रुपयाचा बेकायदेशीर व्यवहार केल्याची माहिती मिळाली. सगदेव यांनी यासंदर्भात समाधानकारक स्पष्टीकरण सादर केले नाही. परिणामी, वाघमारे यांनी सीताबर्डी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली.