लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सीएएला देशभरात विरोध होत आहे. प्रत्यक्षात सीएएमुळे कुणावरही अन्याय होणार नाही. तरीही चुकीचा भ्रम पसरविला जात आहे. विदेशात राहणाऱ्या ज्या हिंदूंवर अन्याय झाला त्यांना भारतामध्ये नागरिकत्व द्यावे, अशी त्यात तरतूद आहे, असे प्रतिपादन माजी वित्तमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.‘लोकमत’शी बोलताना मुनगंटीवार म्हणाले, मूळ भारतीय असणाऱ्या निर्वासितांवर तिकडे अन्याय होत असताना ते भारतात येऊ इच्छित असतील तर त्यांना स्वत:च्या देशात सामावण्याची गरज आहे. मात्र त्यासाठी विरोध केला जात आहे. हा कायदा सहिष्णुतेसाठी आहे. मात्र तरुणांची माथी भडकविण्याचे काम देशात सुरू आहे. इटलीतून आलेल्यांना भारतीयत्व मिळू शकते तर त्यांना का नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यामुळे कुणाचेही नागरिकत्व धोक्यात येणार नाही. आलेच तर आमदारकीचा राजीनामा देणारे आपण पहिले आमदार राहू.विद्यमान सरकारवर संधान साधताना मुनगंटीवार म्हणाले, या सरकारकडून विकासाची कसलीही अपेक्षा नाही. या राज्यात ४७ वर्षे २ महिने राज्य केले. तरीही महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जे सरकार आतापर्यंत सोडवू शकले नाही, त्यांच्याकडून आता तरी विकासाच्या अपेक्षा काय करणार ?जनतेचा विश्वासघात झाला हे मात्र खरे आहे. मुख्यमंत्र्यांना स्वत:च्या बळावर कोणत्याच घोषणा करता येत नाही. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यामध्ये फसलेले हे मुख्यमंत्री आहेत. एवढी वर्षे सत्तेत राहूनही या दोन्ही नेत्यांच्या सरकारच्या काळात अद्यापही सर्वसामान्यांचे प्रश्न सुटले नाहीत, हे मात्र खरे आहे.
सीएएमुळे कुणावरही अन्याय नाही : मुनगंटीवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 8:42 PM