उमरेड : तालुक्यातील १४ ग्रामपंचायतीमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीत अर्ज दाखल करण्यासाठी अखेरच्या दिवशी निवडणूक यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली. सकाळी उमेदवारी दाखल करायला आलेल्यांचे काम दुपारी आणि दुपारी रांगेत लागलेल्यांना सायंकाळी उशिरापर्यंत थांबावे लागले. ऐनवेळी ऑनलाईन यंत्रणा कोलमडल्याने ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यात आले. यामुळे ही समस्या उद्भवली. उमरेड तहसील कार्यालयात वेगवेगळ्या ठिकाणी पाच टेबलवर अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली होती. पाच टेबल असूनही नेमके अखेरच्याच दिवशी एकाचवेळी गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले. अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत अनेकजण उमेदवारी अर्जाचे रकाने भरत असतानाचे दृश्य दिसून येत होते. पाच टेबलवर सकाळी १० वाजतापासून सुरू झालेली गर्दी सायंकाळी उशिरापर्यंत दिसून आली.
११६ सदस्यांची होणार निवड
उमरेड तालुक्यातील एकूण १४ ग्रामपंचायमध्ये एकूण ४२ प्रभागात ११६ ग्रामपंचायत सदस्य निवडून आणावयाचे आहेत. नवेगाव साधू या ग्रामपंचायतमध्ये सर्वाधिक ११ सदस्य संख्या आहे.
१८,८१७ मतदार
उमरेड तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींमध्ये एकूण १८,८१७ मतदार आहेत. यामध्ये ९,९७६ पुरुष आणि ८,८४१ स्त्री मतदारांचा समावेश आहे. सर्वाधिक मतदार असलेली ग्रामपंचायत नवेगाव साधू आहे. येथे एकूण २,६८४ मतदार आहेत. सर्वात कमी केवळ ६,६४ मतदार सालईराणी या ग्रामपंचायतीमध्ये आहे. अन्य ग्रामपंचायतीचे नाव आणि मतदार पुढीलप्रमाणे आहेत. चनोडा (२,१२४), किन्हाळा (८६९), शेडेश्वर (१,१०१), सावंगी खुर्द (१,१५६), बोरगाव लांबट (१,२४४), कळमणा बेला (९,७४), खुसार्पार बेला (९,३४), खैरी बुटी (१,०२१), शिरपूर (१,४७४) खुर्सापार उमरेड (१,३४३), विरली (१,५२४), मटकाझरी (१,७०५) या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.