सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘नॉर्मल डिलिव्हरी’च व्हावी अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. मेडिकलमध्ये ‘सिझेरियन डिलिव्हरी’पेक्षा ‘नॉर्मल डिलिव्हरी’च अधिक होतात. यामुळेच प्रसूतीचे प्रमाण मोठे आहे. परंतु कोरोनाचा दुसऱ्या लाटेत ‘सिझेरीयन’चे प्रमाण वाढल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जानेवारी ते जून २०२१ या दरम्यान एकूण २ हजार ७७२ प्रसूती झाल्या. यात ‘नॉर्मल’चे प्रमाण ४४ टक्के तर ‘सिझेरीयन’ प्रमाण ५१ टक्के आहे.
गरीब व सामान्य रुग्णांसाठी मेडिकल आशेचे केंद्र ठरले आहे. येथे केवळ विदर्भच नाही तर आजूबाजूच्या चार राज्यातून रुग्ण येतात. प्रसूतीदरम्यान गुंतागुंत झाल्यास अशा मातांना मेडिकलमध्ये पाठविण्याचे प्रमाण मोठे आहे. यामुळे सर्वात व्यस्त विभाग म्हणून स्त्री रोग व प्रसूती विभागाची ओळख आहे. कोरोना काळातही या विभागाने उत्तम कामगिरी बजावली आहे. या विभागाचा ‘नॉर्मल डिलिव्हरी’ करण्याकडेच अधिक कल असतो. ‘नॉर्मल डिलिव्हरी’ होणे म्हणजे कोणताही धोका नसणे. डिलिव्हरी नंतर काही दिवसात स्त्री आपले दैनंदिन जीवन जगू शकते. मात्र आई किंवा बाळाला धोका असल्यावर ‘सिझेरियन डिलिव्हरी’ केली जाते. यात ऑपरेशन करून बाळाला बाहेर काढले जाते. यामुळे दैनंदिन जीवन सुरू करण्यासाठी स्त्रीला खूप आराम करावा लागतो. शारीरिक त्रासही मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे स्त्रियांच्या मनात या प्रसूतीबद्दल भीती असते. मेडिकलमध्ये मागील दोन वर्षात ‘नॉर्मल डिलिव्हरी’चे प्रमाण वाढले होते. परंतु या वर्षात ७ टक्क्याने ‘सिझेरियन डिलिव्हरी’चे प्रमाण वाढले आहे.
-सहा महिन्यात १ हजार ४२१ ‘सिझेरियन’
२०१९ मध्ये मेडिकलमध्ये एकूण १२ हजार १४९ प्रसूती झाल्या. यात ६ हजार १७ (४९ टक्के) ‘नॉर्मल’ तर ५ हजार ७८३ (४७ टक्के) ‘सिझेरियन डिलिव्हरी’ होत्या. कोरोनाची पहिली लाट २०२० मध्ये आली. या वर्षात एकूण ९ हजार २३९ प्रसूती झाल्या. यात ४ हजार ८७० (५२ टक्के) ‘नॉर्मल’ तर ४ हजार ४० (४३ टक्के) ‘सिझेरीयन डिलिव्हरी’ होत्या. कोरोनाची दुसरी लाट फेब्रुवारी २०२१ पासून सुरू झाली. जानेवारी ते ३० जून या दरम्यान एकूण २ हजार ७७२ प्रसूती झाल्या. यात १ हजार २२७ (४४ टक्के) नॉर्मल तर त्यापेक्षा जास्त म्हणजे, १ हजार ४२१ (५१) टक्के ‘सिझेरियन डिलिव्हरी’ झाल्या.
-‘हायरिस्क’ मातांमुळे ‘सिझेरियन’ वाढले!
कोरोनाचा दुसऱ्या लाटेत बाधितांच्या संख्येने उच्चांक गाठला होता. यामुळे मेडिकलमध्येही बाधित गर्भवतींची संख्या वाढली. यातच प्रसूती दरम्यान गुंतागुंत निर्माण होऊन मातेला व तिच्या पोटातील बाळाला जीवाचा धोका निर्माण झालेल्या ‘हायरिस्क’ मातांची संख्या वाढली. परिणामी, ‘सिझेरियन’ वाढले. परंतु हे प्राथमिक कारण आहे. याचा अभ्यास होणे गरजेचे आहे.
-डॉ. आशिष झरारिया, सहयोगी प्राध्यापक स्त्री रोग व प्रसूती विभाग, मेडिकल
२०१९ एकूण प्रसूती: १२,१४९
नॉर्मल डिलिव्हरी :६०१७ (४९ टक्के)
सिझेरियन डिलिव्हरी : ५७८३ (४७ टक्के)
२०२० एकूण प्रसूती : ९२३९
नॉर्मल डिलिव्हरी :४८७० (५२ टक्के)
सिझेरियन डिलिव्हरी : ४०४० (४३ टक्के)
२०२१ (३० जूनपर्यंत) एकूण प्रसूती : २७७२
नॉर्मल डिलिव्हरी : १२२७ (४४ टक्के)
सिझेरियन डिलिव्हरी : १४२१ (५१ टक्के)