लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कारभाराचे वाभाडे ‘कॅग’च्या (कॉम्पट्रोलर अॅन्ड आॅडिटर जनरल आॅफ इंडिया) अहवालात काढण्यात आले. परंतु नागपूर विद्यापीठ प्रशासनाने ‘कॅग’च्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘कॅग’ने अहवालात दिलेली माहिती चूक असून अयोग्य आकडेवारी सादर करण्यात आल्याचा दावा विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. कुलगुरु डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनीदेखील ‘कॅग’च्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. ‘कॅग’च्या अहवालावर आधारित ‘नागपूर विद्यापीठात ७० कोटींचे गोलमाल’ हे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते हे विशेष.‘कॅग’तर्फे ३१ मार्च २०१७ रोजी संपलेल्या वर्षाचा अहवाल राज्य विधीमंडळात सादर करण्यात आला. ‘कॅग’ने २०१२-१३ ते २०१६-१७ या कालावधीची तपासणी करण्यासाठी जानेवारी ते जून २०१७ दरम्यान लेखापरीक्षण केले होते. नागपूर विद्यापीठ निधीच्या आर्थिक व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणात उणीवा असून अनेक बाबींमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका ‘कॅग’तर्फे ठेवण्यात आला आहे. विद्यापीठ विभाग, परीक्षा केंद्र, कर्मचारी इत्यादींना देण्यात आलेल्या अग्रिमाच्या रकमेपैकी ७० कोटी ९० लाख रुपयांची रक्कम अद्यापही असमायोजित आहे. यातील काही अग्रीम रक्कमेचे समायोजन तर १९८८ पासून प्रलंबित आहे. असा स्थितीत या निधीची अफरातफर होण्याची शक्यता ‘कॅग’तर्फे वर्तविण्यात आली आहे. ‘कॅग’ने विद्यापीठाच्या विविध धोरणांवर ताशेरे ओढत महाविद्यालय संलग्नीकरण प्रक्रियेतील घोळ, शिक्षणप्रणाली, संशोधनातील माघारलेपणा इत्यादींवर अहवालातून बोट ठेवले.यासंदर्भात विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी डॉ.राजू हिवसे यांना विचारणा केली असता त्यांनी अगोदर ‘कॅग’चा अहवालच आला नसल्याचा दावा केला. ज्यावेळी त्यांना विधीमंडळाबाबत माहिती देण्यात आली तेव्हा त्यांनी ‘कॅग’च्या चमूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विद्यापीठाची पाहणी करायला आलेल्या ‘कॅग’च्या चमूने प्राथमिक अहवालात चुकीचे आकडे दिले होते. आम्ही त्याला आक्षेप घेत ‘एक्झिट मिटींग’मध्ये कागदपत्रे व पुराव्यांनिशी सुधारणा सुचविल्या होत्या. तरीदेखील विद्यापीठाबाबत चुकीची माहिती अहवालात आली, असे डॉ.हिवसे म्हणाले.माझे संशोधन कुठे गेले ?‘कॅग’च्या अहवालात विद्यापीठातील संशोधनावर ताशेरे ओढण्यात आले आहे. विद्यापीठात ५ वर्षांत कुठलेही संशोधन प्रसारित झाले नाही, असे नमूद आहे. मात्र इतर शिक्षकांचे सोडा, मात्र मी स्वत: संशोधन प्रकल्प पूर्ण केले आहेत. कुलगुरू म्हणून माझे संशोधनदेखील त्यांना दिसले नाही का, असा प्रश्न कुलगुरूंनी उपस्थित केला. विशेष म्हणजे २०१२-१३ ते २०१६-१७ यादरम्यान विद्यापीठाच्या कामगिरीवरुनच ‘नॅक’ने विद्यापीठाला ‘अ’ दर्जा दिला. ‘नॅक’समोर सादर केलेली आकडेवारीच ‘कॅग’ला दिली होती. अहवाल अंतिम होण्याअगोदरदेखील आम्हाला ‘कॅग’च्या चमूने काहीच कळविले नाही, असे डॉ.काणे यांनी सांगितले.