नागपूर :डिजिटल इंडिया कार्यक्रमाला देशाच्या कानाकोपऱ्यात नेण्यासाठी कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) देशातील एक कोटी व्यापाऱ्यांना डिजिटलव्यवसायाचे धडे देणार आहे. शिवाय व्यापाऱ्यांना व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून व्यावसायिक मोहिमेशी जोडणार आहे.
कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे डिजिटल इंडियाचे स्वप्न संपूर्ण देशातील व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे कॅटचे लक्ष्य आहे. याअंतर्गत नागपुरात आयोजित एका व्यापारी संमेलनात ह्यव्हॉट्सअॅप व्यवहाराने व्यवसायात वाढ, या विषयांतर्गत व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. काळाची गरज पाहता डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून व्यापाऱ्यांना व्यवसायात पुढे जाण्याचे आवाहन करण्यात आले.
देशातील छोट्या व्यावसायिकांना सशक्त बनविण्याचा हा प्रयत्न आहे. प्रारंभी १ कोटी व्यापाऱ्यांना डिजिटलरीत्या प्रशिक्षित आणि कुशल बनविण्यात येईल. २९ राज्यांमध्ये ११ भारतीय भाषांसह स्थानिक डिजिटल प्रशिक्षणासह व्यवसायात विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा कॅटचा प्रयत्न आहे. याद्वारे कॅट देशातील अखेरच्या व्यापाऱ्यापर्यंत पोहोचणार आहे.
४० हजार संघटनांशी जुळले आहेत ८ कोटी व्यापारी
भरतीया म्हणाले, संपूर्ण देशात ४० हजार संघटनांशी ८ कोटींपेक्षा जास्त व्यापारी जुळले असून त्यांना कॅटच्या प्रशिक्षणाचा फायदा होईल. डिजिटल प्रशिक्षण देण्यासाठी डिझाईन करण्यात आलेल्या कार्यशाळांची श्रृंखला देशभरात आयोजित करण्यात येईल. यामध्ये व्हॉट्सअॅपच्या बिझनेस अॅपवर 'दुकान'मध्ये कॅटलॉग, क्विक रिप्लाय, क्लिक टू व्हॉट्सअॅप या सारख्या सुविधा आहेत. छोट्या दुकानदारांना ग्राहकांशी सुलभ व्यवहारासाठी हे अॅप फायद्याचे ठरणार आहे.
कार्यक्रमात कॅटचे राष्ट्रीय सचिव प्रवीण खंडेलवाल, गोपाल अग्रवाल, किशोर धाराशिवकर, निखिलेश ठक्कर, मधुसूदन त्रिवेदी, प्रभाकर देशमुख, राजकुमार गुप्ता, ज्ञानेश्वर रक्षक, अनिल अहिरकर, अर्जुनदास आहुजा, रामअवतार तोतला, स्वप्निल अहिरकर, मयूर पंचमतिया, गोल्डी तुली, अनिल नागपाल, निकुंज दायमा, ज्योती अवस्थी, जया शेख, फारुख अकबानी, रूपा नंदी, जयश्री गुप्ता गोविंद पटेल संजीवनी चौधरी, विनोद गुप्ता उपस्थित होते.