- योगा शेडसाठी तोडले चालू अवस्थेतील म्युझिकल फाउंटेन
- एका उपक्रमासाठी नागरिकांच्या मनोरंजनालाच दाखवला ठेंगा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विकासाच्या नावावर केलेली नासधूस म्हणजे, पैसा लाटण्यासाठी केलेली अंतर्गत खेळी, असाच त्याचा अर्थ होतो. दिघोरी परिसरातील आदर्श प्रगती कॉलनी येथे असलेल्या मनपाच्या उद्यानातील विकासकामे, त्याच खेळीचा एक भाग असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. येथे १० वर्षांपूर्वी उभारण्यात आलेले म्युझिकल फाउंटेन केवळ योगाशेडसाठी तोडण्यात येत असल्याचे स्पष्ट होत आहे.
आदर्श प्रगती कॉलनी येथे २०१०-११ व ११-१२च्या मनपाच्या अर्थसंकल्पात ५० लाख रुपयांची तरतूद करून उद्यान उभारण्यात आले. त्याचवेळी १५ लाख रुपयांच्या तरतुदीनुरूप म्युझिकल फाउंटेन, टाके, साऊंड सिस्टम व लायटिंगची व्यवस्था करण्यात आली. विशेष म्हणजे, पूर्व व दक्षिण नागपूरच्या या परिसरातील हे एकमेव म्युझिकल फाउंटेन झाले. मात्र, आता त्याच ठिकाणी योगाशेड उभारण्यात येत आहे. त्यासाठी एवढा मोठ्ठा खर्च करून उभारण्यात आलेले म्युझिकल फाउंटेन उद्ध्वस्त करण्यात आले आहे. या प्रकारामुळे मनपाने नागरिकांची नाराजी ओढवून घेतली आहे. एकीकडे मनपाकडून उद्यानांच्या खाजगीकरणाचा घाट सुरू आहे. कोषागार विकासासाठी निधी अपुरा असल्याचे कारण त्यासाठी सांगितले जात आहे. अशा स्थितीत आपल्याच पैशाची नासधूस का व्हावी, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
योगाशेड महत्त्वाचे की मनोरंजन?
लाखो रुपये खर्च करून लहान मुले व नागरिकांच्या मनोरंजनासाठी हे फाउंटेन उभारण्यात आले होते. काही वर्षे सुरू असल्यानंतर ढिसाळ कारभारामुळे हे फाउंटेन बंद ठेवण्यात आले. आता त्याच ठिकाणी योगाशेड उभारण्यात येत आहे. योगाशेडसाठी उद्यानात दुसरी जागा नव्हती का? सकाळ व संध्याकाळी एक तासाच्या योगाभ्यास वर्गासाठी नागरिकांच्या मनोरंजनाशी तडजोड का? उद्यानातील हिरवळीवर योगाभ्यास होत नाही का, असे अनेक सवाल नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
आमचेच कर आणि आमचीच नासधूस
नागरिकांकडून घेतल्या जात असलेल्या करातूनच शहराचा विकास साधला जातो. उद्यानांची उभारणीही त्याच करातून होते. त्यानंतर त्याच पैशाची नासधूस का व्हावी? हे फाउंटेन पुन्हा विधिवत उभारावे आणि नागरिकांच्या भावनेचा सन्मान ठेवावा. अन्यथा नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागेल.
- भारतभूषण गायकवाड, माजी नगरसेवक
.............