नागपूर : इमारतींच्या जंगलात हिरवळीचा आल्हाद देणारे स्थळ म्हणजे छोटशी बाग असते. आपण त्याला गार्डन, पार्क अशा नावाने ओळखतो. सिमेंटीकरणाच्या शहरीकरणात ही बागच नागरिकांना निसर्गाशी समरस करण्यास कारक ठरते. मात्र, शहरातील या बागांची अवस्थाही मानवाने जंगलावर कुऱ्हाड हाणावी तशी झालेली आहे. स्वत:च्या समाधानासाठी स्वत:च उभारलेल्या या इवल्याश्या हरितस्थळाची निगा स्वत:लाच राखता येऊ नये, यापेक्षा दुसरे दुर्दैव ते कोणते. बागेच्या नावाखाली केवळ बागेचा आभास आहे, दुसरे काही नाही, अशी स्थिती आहे.
शहरातील बहुदा सर्वात जुनी अशी बाग म्हणून म्हाळगीनगरातील स्वातंत्र्य संग्राम सैनिक वसाहतीत असलेल्या शिवाजी पार्कची स्थिती अशीच काहीशी आहे. वृक्षांचा दुष्काळ आहे आणि गवताची भरमार आहे. वॉकिंग स्ट्रीट म्हणजे खड्ड्यातून उडी मारावी लागू नये म्हणून केलेली व्यवस्थाच जणू. तीही समतल नाही. ग्रीन जीमचे चारच इन्स्ट्रूमेंट आहेत आणि त्याचेही मेन्टेनन्स न झाल्याने मोडकळीस आले आहेत. जसे पक्ष्यांचा चिवचिवाट आणि कुजबुजण्याशिवाय जंगलाची शान नाही तसेच चिमुकल्या बापड्यांशिवाय बागेचे सौंदर्य खुलत नाही. मात्र, मुलांसाठी असलेली खेळणी जीवावर उदार झालेली आहेत. सर्वच तुटलेले, फुटलेले, मोडलेले अन् कुजलेले आहेत. मग, ही बाग कशी म्हणावी हा प्रश्न आहे. येथे दररोज व्यायामासाठी, फिरण्यासाठी आणि काहीसा शांततेचा वेळ घालविण्यासाठी येणाऱ्या शोभा भुजाडे, कमल नेहारे, विशाल कोरके, राजेश कानपिल्लेवार, पंकज साठवणे, सुरेंद्र राऊत, राजू गौतम, सुरज धनविजय, राजे नागोसे, राजू धानोरे, चंदू बिहारी, योगेश सोनारे, विपिन डोमडे यांनी ही व्यथा लोकमतकडे व्यक्त केली.
* एकच गार्डन अन् तीही भकास
म्हाळगीनगरातील हे २५ वर्ष जुने गार्डन आहे. गजानननगर, महात्मा गांधीनगर, स्वातंत्र्य संग्राम वसाहत मिळून हे एकच गार्डन आहे. मात्र, त्याची व्यवस्था लावणे प्रशासनाला जमत नसल्याचे दिसते. मेन्टेनन्स केले जात नाही. आधी काही सुरक्षा रक्षक होते. तेही काढून टाकण्यात आले. एकच वृद्ध आजीबाई येथे झाडण्याचे काम करते. मात्र, एवढ्या मोठ्या गार्डनच्या स्वच्छतेची जबाबदारी एका वृद्ध आजीला देणे म्हणजे गैरजबाबदारीचेच लक्षण आहे. शिवाय, गार्डनच्या नजिक बार, वाईन शॉप आहेत. तेथून मद्यबॉटल घेऊन मद्यपी गार्डनमध्येच ठाण मांडतात. खुर्च्यांची व्यवस्था एखाद्या बारला शोभेल अशी करून ठेवण्यात आली आहे.
* योगाशेड नाहीच. ओटा तुटलेला आहे. त्यामुळे, घरूनच आसन आणून जमिनीवर योगाभ्यास करत असतो.
- शोभा भुजाडे
* खेळणी तुटलेली असल्याने मुले खेळणार कशी. एखादवेळी गंभीर जखमा होण्याची भीती असते.
- कमल नेहारे
* पाण्याची टाकी कायम रिकामी असते आणि पावसाळ्यात गार्डनमध्येच डबके साचलेले असते.
- विशाल कोरके
* सगळ्यात जुने गार्डन आणि तरीही चारच ग्रीन जीम इन्स्ट्रुमेंट. त्यांचीही व्यवस्था नाही.
- राजेश कानपिल्लेवार
* व्यवस्था नसल्याने आम्ही समूहाने व्यायामाचे साहित्य आणतो आणि सकाळ-संध्याकाळी व्यायाम करत असतो.
- पंकज साठवणे
* सगळ्या जुन्या गार्डनकडे प्रशासनाचे असलेले दुर्लक्ष म्हणजे शहर सांभाळण्यास प्रशासन असमर्थ असल्याचेच भासते.
- सुरेंद्र राऊत
..............