खोटे बोलून केले होते लग्न : वकील महिलेचे कारस्थाननागपूर : खोटी माहिती देऊन मुंबईच्या तरुणासोबत लग्न करणाऱ्या एका महिलेने वर्षभरातच त्या तरुणाचे संसाराचे स्वप्न मोडले. एवढेच नव्हे तर घटस्फोटासाठी नागपुरात बोलवून रोख रक्कम आणि मौल्यवान चिजवस्तू हिसकावून घेत त्याची बेदम धुलाई केली. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. विशेष म्हणजे, या प्रकरणातील मुख्य आरोपी महिला वकील आहे. विभा मेश्राम तिचे नाव असून, ती कडबी चौकाजवळच्या लुंबिनीनगरात राहाते. लग्नाच्या काही वर्षातच विभाचा पहिल्या पतीशी काडीमोड झाला. त्यानंतर तिने शादी डॉट कॉमवर स्वत:ची माहिती दिली. आपण अविवाहित असल्याचेही नमूद केले. मुंबईच्या श्री निकेतन को-आॅपरेटिव्ह सोसायटीत राहणारा राहुल मुकुंद रोटे (वय ३१) या तरुणाने ही माहिती वाचल्यानंतर विभाशी संपर्क साधला. आॅक्टोबर २०१४ मध्ये आॅनलाईन संपर्क वाढल्यानंतर तिला लग्नाची मागणी घातली. दोन्हीकडून होकार असल्याने राहुल नागपुरात आला. या दोघांनी गेल्या वर्षी येथील एका बुद्धविहारात लग्न केले. काही दिवस ठिकठाक गेल्यानंतर विभा घटस्फोटित असल्याचे राहुलला कळले. त्यामुळे त्याने विभाशी संबंध तोडले. त्यानंतर या दोघांमध्ये घटस्फोटावरून कुरबूर सुरू झाली. तो सारखी सारखी घटस्फोटाची मागणी करीत असल्याचे पाहून विभाने त्याला काही दिवसांपूर्वी घटस्फोटाचे दस्तावेज तयार केल्याचे सांगून मुंबईहून नागपुरात बोलवले. त्यानुसार शुक्रवारी राहुल नागपुरात आला. लुटमार करून विमानतळावर सोडलेविभाने आपल्या तीन साथीदारांना आधीच तयार करून ठेवले होते. त्यानुसार, राहुलला शुक्रवारी एका खोलीत डांबून विभा आणि तिच्या मित्रांनी चाकू, लोखंडी तव्याने मारहाण केली. त्याच्याजवळचे ७ हजार रुपये, १६ हजारांचा मोबाईल आणि एटीएम कार्ड हिसकावून घेतले. त्याला वाहनात घालून विमानतळावर नेले. पुन्हा नागपुरात आला तर जीवे ठार मारू, अशी धमकी देऊन आरोपी विभा साथीदारांसह पळून आली. जखमी राहुलने जरीपटका पोलीस ठाणे गाठून ठाणेदार दीपक खोब्रागडे यांना कैफियत ऐकवली. त्याची तक्रार नोंदवून घेतल्यानंतर पोलिसांनी विभा तसेच तिच्या तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पीएसआय पी. बी. खरे आरोपींचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)
घटस्फोटासाठी बोलावून पतीला केली मारहाण
By admin | Published: October 25, 2015 3:08 AM