योगेश पांडे/लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फिलिपिन्समध्ये झालेल्या ‘कोरोना’च्या चक्रव्यूहात फसल्याने महाराष्ट्रातील सुमारे ४० हून अधिक विद्यार्थी अस्वस्थ झाले. अशा प्रसंगात कुटुंबीयांसह राहावे या विचारातून सर्वांनी मायदेशाकडे धाव घेतली. त्यांच्या विमानाचे उड्डाण झाले अन् त्या कालावधीत फिलिपिन्ससह मलेशियातून येणारी विमाने रद्द करण्यात आली. नाईलाजाने त्यांना अगोदर मलेशिया व त्यानंतर सिंगापूरला अडकावे लागले. मुंबईला परतण्यासाठी त्यांच्या हाती ‘बोर्डिंग पास’देखील आला. मात्र नव्या नियमांचा हवाला देत तोदेखील फाडण्यात आला. दिवसभरापासून ते सिंगापूरच्या चांगी विमानतळावर अडकून आहेत. आता पुढे काय करायचे, याची कुठलीही दिशा स्पष्ट नाही अन् परत फिलिपिन्सला जायची हिंमत नाही. अशा स्थितीत ‘ने मजसी परत मातृभूमीला’ अशीच आर्तसाद विद्यार्थ्यांनी घातली आहे.फिलिपिन्समध्ये ‘कोरोना’चा कहर वाढल्याने तेथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी तातडीने भारतात परतण्याचा निर्णय घेतला. काही विद्यार्थी दिल्लीमार्गे तर काही मुंबईमार्गे परतायला सुरुवात झाली. १७ मार्च रोजी महाराष्ट्रातील ४० हून अधिक विद्यार्थी निघाले. त्यांचे विमान मलेशियामार्गे मुंबईला येणार होते. मात्र मलेशियातील विमानांना भारतात प्रवेश नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्या वेळी सर्व विद्यार्थी विमानातच होते. मलेशियाला पोहोचल्यावर त्यांनी ही बाब कळाली. त्यानंतर सिंगापूरमार्गे मुंबईकडे जाता येईल असे त्यांना सांगण्यात आले. तब्बल १९ तासांनंतर ते क्वालालांपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाहून निघाले व बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास सिंगापूरच्या चांगी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. तेथे काही विद्यार्थ्यांना सुरुवातीला ‘बोर्डिंग पास’ देण्यात आला. परंतु ‘एअर इंडिया’ने फिलिपिन्स व मलेशियातून येणाºया प्रवाशांना नेण्यास नकार दिल्याचे त्यांना कळाले. काही वेळातच त्यांच्याकडून ‘बोर्डिंग पास’ घेऊन फाडण्यात आले. आता विद्यार्थी ना फिलिपिन्सला परतू शकत आहेत व ‘एअर इंडिया’च्या धोरणांनुसार मुंबईलादेखील येऊ शकत नाहीत. सिंगापूरमध्येदेखील जास्त वेळ राहू शकणार नाहीत. त्यामुळे आता आम्ही काय करावे, असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित करण्यात येत आहे. यासंदर्भात त्यांनी ‘व्हिडिओ’देखील काढून केंद्र सरकारला मदतीचे आवाहन केले आहे.विशेष विमानाची सोय करावी‘फिलिपिन्स’मध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारा दुर्वेश अविनाश गाणार हा विद्यार्थीदेखील अडकला आहे. चांगी विमानतळावर आम्ही अडकलो असून आता काय करावे हे काहीच कळत नाही. आम्ही भारतीय दूतावासालादेखील संपर्क केला. परंतु तिकडूनदेखील अद्याप काही ठोस उत्तर आलेले नाही. आमच्या घरचे लोक काळजी करत असून केंद्र सरकारने त्वरित आमची मदत करावी, असे दुर्वेशने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सिंगापूरमधून मुंबईला विमाने येऊ दिली जात आहेत. त्यामुळे आम्हाला मुंबईत येण्याची परवानगी द्यावी. असे शक्य नसेल तर सरकारने विशेष विमानाची सोय करावी व आम्हाला ‘एअरलिफ्ट’ करावे, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. क्वालालांपूर विमानतळावर त्यांच्या जेवणाची सोय करण्यात आली होती. मात्र चांगी विमानतळावर पाण्याशिवाय त्यांना काहीही देण्यात आले नाही.
फिलिपिन्समधील विद्यार्थ्यांची हाक...ने मजसी मातृभूमीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 12:30 AM
फिलिपिन्समध्ये झालेल्या ‘कोरोना’च्या चक्रव्यूहात फसल्याने महाराष्ट्रातील सुमारे ४० हून अधिक विद्यार्थी अस्वस्थ झाले. ‘ने मजसी परत मातृभूमीला’ अशीच आर्तसाद विद्यार्थ्यांनी घातली आहे.
ठळक मुद्देमूळचे महाराष्ट्राचे विद्यार्थी ‘सिंगापूर’मध्ये अडकले : नागपुरातील विद्यार्थ्याचादेखील समावेशउड्डाणाची परवानगी नसल्याने ‘बोर्डिंग पास’देखील फाडले