स्मारक समितीचा नवा पायंडा : २७ लाख रुपये निघालेनागपूर : दीक्षाभूमीवरील मध्यवर्ती स्मारकातील दानपेट्या मंगळवारी उघडण्यात आल्या. या दानपेट्यातील दानाची ‘इन कॅमेरा’ व नागरिकांच्या उपस्थितीत मोजणी करण्यात आली. या दानपेटीतून जवळपास २७ लाख रुपयांचे दान मोजण्यात आले. ते लगेच स्मारक समितीच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य विलास गजघटे यांनी यासंबंधात अधिक माहिती देतांना सांगितले की, दीक्षाभूमी येथील स्मारकाला दरवर्षी लाखो अनुयायी भेट देत असतात. अनुयायी आपापल्या परीने दानपेट्यांमध्ये आर्थिक दानही करीत असतात. परंतु या दानपेट्यांमध्ये दरवर्षी किती दान जमा झाले, याची माहिती मात्र आजवर सार्वजनिक केली जात नव्हती. त्यामुळे नागरिकांमध्ये काही गैरसमजही निर्माण होत होते. स्मारक समितीने यावर्षीपासून पहिल्यांदाच नवीन पायंडा पाडत या दानपेट्यातील दानाची रक्कम सार्वजनिकरीत्या मोजण्याचा निर्णय घेतला. त्यानुुसार स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी सकाळी ८ वाजता मध्यवर्ती स्मारकामध्येच आॅन कॅमेरा या दानपेट्या उघडण्यात आल्या. यावेळी स्मारकात दर्शनासाठी आलेले नागरिकही दानाची रक्कम मोजतांना उपस्थित होते. स्मारक समितीचे सदस्य व महाविद्यालयातील ३५ प्राध्यापकांनी दान पेट्यातील रक्कम मोजली. रक्कम मोजून झाल्यानंतर लगेच ती स्मारक समितीच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. (प्रतिनिधी)
दीक्षाभूमीतील दानाची ‘इन कॅमेरा’ मोजणी
By admin | Published: October 16, 2015 3:15 AM