ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 10 - महावितरण कंपनीने थकबाकीदार सार्वजनिक पाणी पुरवठा योजनांविरुद्ध हाती घेतलेल्या धडक मोहिमेचा अनेकांनी धसका घेतला असून, नागपूर परिमंडलातील ३६३ योजनांनी तब्बल १ कोटी ३६ लाख ३० हजाराच्या
थकबाकीचा भरणा केला आहे. यामुळे संबंधित योजनांना पिण्याच्या पाण्याचे संकट अंशत: टाळण्यात यश मिळाले आहे. मात्र त्याचवेळी अजूनही २ कोटी ७२ लाख ५२ हजारांची थकबाकी असलेल्या अन्य १६१ पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा
खंडित करण्यात आला आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार महावितरणच्या नागपूर परिमंडलातील २ हजार ७५१ सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांकडे सुमारे ३७ कोटी ६७ लाख २० हजाराची थकबाकी आहे. त्यात नागपूर ग्रामीण मंडलातील १ हजार ७६४ ग्राहकांकडे ३१ कोटी २७
लाख ७० हजार, नागपूर शहर मंडलातील १९१ ग्राहकांकडे १ कोटी ६९ लाख आणि वर्धा मंडलातील ७९६ ग्राहकांकडे ५ कोटी ७० लाख ५१ हजाराची थकबाकी आहे.
यापैकी नागपूर ग्रामीण मंडलातील २ कोटी १५ लाख २८ हजाराची थकबाकी असलेल्या ८३ योजना, नागपूर शहर मंडलातील ६ लाख ६५ हजाराची थकबाकी असलेल्या ९ योजना आणि वर्धा परिमंडलातील ५० लाख ६० हजाराचची थकबाकी असलेल्या ६५ योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तसेच इतर १ हजार ७३० योजनांना वीजपुरवठा खंडित करण्याबाबत नोटीस बजावण्यात आल्या आहे.