लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाहनाच्या काचांवर काळी फिल्म लावून धावणाऱ्या हजारांवर वाहनचालकांवर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सोमवारी कारवाई केली. आज सकाळपासूनच ही विशेष मोहीम शहरात राबविण्यात आली.वाहनाची फिल्म तात्काळ काढून टाका आणि चालकांवर चालान कारवाई करा, असे आदेश नागपूरसह राज्यातील सर्व पोलीस अधीक्षक आणि पोलीस आयुक्त कार्यालयांना शनिवारी अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतूक) यांनी दिले होते. त्यामुळे काळी फिल्म लावून धावणाºया वाहनांवर सोमवारपासून नागपूर पोलिसांनी विशेष कारवाईची मोहीम राबविली. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांच्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी १.३० वाजेपर्यंत शहरात ५३३ वाहनांवर कारवाई केली होती.केंद्रीय मोटार वाहन नियमानुसार, सुरक्षेच्या कारणावरून महत्त्वाच्या-अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांच्या काचांवर काळी फिल्म लावण्यास परवानगी आहे. झेड आणि झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात आलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांच्या काचांवरही काळी फिल्म लावण्याची मुभा आहे. याव्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीच्या वाहनांच्या काचांवर काळी फिल्म लावण्यास परवानगी नाही. मात्र, अनेक जण आपल्या वाहनांच्या काचांवर काळी फिल्म लावून धावतात. अशी वाहने सर्वत्र सर्रास आढळतात. गैरप्रकारात गुंतलेली मंडळी या काळ्या फिल्मच्या आड काय करतात, ते वारंवार उजेडात आल्यामुळे अभिषेक गोयंका यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका (क्र. २६५/ २०११) दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने वाहनांच्या काचांवर लावलेल्या काळ्या फिल्म तात्काळ काढून टाकण्याचे आदेश दिले होते. या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे लक्षात आल्याने, राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विनय कारगांवकर यांनी राज्यातील सर्व पोलीस अधीक्षक आणि पोलीस आयुक्त कार्यालयांना शनिवारी एक आदेश जारी केला. त्यानुसार, शहर पोलिसांनी सोमवारी सकाळपासून विशेष मोहीम राबवून दुपारी १.३० वाजतापर्यंत ५३३ वाहनांची काळी फिल्म काढून टाकली. सायंकाळपर्यंत हा आकडा हजारावर जाईल, असे वाहतूक शाखेचे पोलीस सांगत होते.
नागपुरात पोलिसांकडून काळी फिल्म काढण्याची धडक मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 12:09 AM
वाहनाच्या काचांवर काळी फिल्म लावून धावणाऱ्या हजारांवर वाहनचालकांवर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सोमवारी कारवाई केली. आज सकाळपासूनच ही विशेष मोहीम शहरात राबविण्यात आली.
ठळक मुद्देएकाच दिवसात हजारावर कारवाई : वाहनचालकांच्या हाती चालान