लाेकमत न्यूज नेटवर्क
खापा : लाॅकडाऊन काळात वारंवार आवाहन करूनही काही दुकानदारांनी त्यांची दुकाने उघडली हाेती. ही बाब लक्षात येताच स्थानिक नगर परिषद प्रशासनाने ती दुकाने सील करण्याची माेहीम हाती घेतली. या माेहिमेंतर्गत शुक्रवारी (दि. २१) शहरातील तीन दुकानांना कुलूप ठाेकून ती सील करण्यात आली.
राज्य शासनाने जमावबंदी व संचारबंदीसाेबतच लाॅकडाऊनची घाेषणा केली आहे. यात विशिष्ट काळात केवळ अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहण्याचे निर्देश प्रशासनाने सर्वांना वेळावेळी दिले आहेत. मात्र, या निर्देशाचे उल्लंघन करीत शहरातील इलेक्ट्रिकल, कापड व पानटपरी अशी तीन दुकाने सुरू करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे प्रशासनाने लगेच त्या दुकानांची पाहणी करून ती तातडीने सील केली. यासाठी पाेलीस प्रशासनाची मदत घेण्यात आली हाेती. ही माेहीम यापुढेही सुरू राहणार असल्याची माहिती पालिकेच्या मुख्याधिकारी डाॅ. ऋचा धाबर्डे यांनी दिली.
शहरातील अत्यावश्यक सेवा व वस्तूंची दुकाने वगळता अन्य सेवा व दुकाने ४० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. या काळात कुणीही दुकाने उघडण्याचा प्रयत्न केल्यास त्यांची दुकाने सील केली जाणार असून, दंडात्मक कारवाई केली जाईल. शिवाय, संबंधित दुकानदारांनी सकाळी ११ वाजेपर्यंतच त्यांची दुकाने सुरू ठेवायची आहेत. या आदेशाचेही कुणी उल्लंघन करू नये, असे आवाहन मुख्याधिकारी डाॅ. ऋचा धाबर्डे यांनी केले आहे. ही कारवाई पालिकेचे लेखा अधिकारी अमोल सोनसरे, गिरीश मोरे, मोनेश रेवतकर, कपिल निनावे यांच्या पथकाने केली.