नागपूर विद्यापीठ : नवीन प्रशासकीय इमारतीचा ‘प्लॅन’ अंतिमनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीसंदर्भात प्रशासनाने तातडीची पावले उचलण्यास सुुरुवात केली आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी राहुल बजाज यांनी १० कोटी रुपये देण्याची तयारी दाखविली आहे. विद्यापीठातर्फे या इमारतीचा ‘प्लॅन’ अंतिम करण्यात आला असून सर्व प्रशासकीय प्रक्रिया आटोपून साधारणत: आॅक्टोबर महिन्यात बांधकामाला सुरुवात होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.बजाज कंपनीकडून ‘सीएसआर’ अंतर्गत येऊ घातलेल्या या निधीच्या माध्यमातून नागपूर विद्यापीठ नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करणार आहे. विद्यापीठाच्या अमरावती मार्गावरील ४४ एकर मोकळ्या जागेवर नवीन प्रशासकीय इमारत प्रस्तावित आहे. एकूण २२ कोटी रुपयांचे ‘बजेट’ असलेल्या या इमारतीचा आराखडा तयार करण्याचे काम एका खासगी संस्थेकडे सोपवण्यात आले होते. या संस्थेने विद्यापीठाला हा ‘प्लॅन’ सादर केला. यासंदर्भात सोमवारी प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत या ‘प्लॅन’वर चर्चा करण्यात आली व विद्यापीठाने याला मंजुरी दिली आहे. या इमारतीसंदर्भात इतर प्रशासकीय मंजुरीसाठीचा कालावधी लक्षात घेतला तरी साधारणत: आॅक्टोबरपासून याचे बांधकाम सुरू व्हायला पाहिजे अशी माहिती विद्यापीठातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर दिली. यासंदर्भात प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)
आॅक्टोबरमध्ये रचला जाणार पाया
By admin | Published: July 29, 2014 12:49 AM