राकेश घानोडेनागपूर : अंबाझरी तलावालगत असलेल्या डॉ. आंबेडकर सांस्कृतिक भवनच्या जागेवर १३ ते १५ एप्रिलपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम आयोजित करता येईल का? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी संबंधित प्रतिवादींना करून यावर उद्याच (गुरुवारी) उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.
प्रतिवादींमध्ये गृह विभागाचे सचिव, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त झोन-२, अंबाझरी पोलीस निरीक्षक, महानगरपालिका आयुक्त, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व मे. गरुडा अम्युझमेंट पार्क कंपनी यांचा समावेश आहे. संबंधित कार्यक्रम घेण्याची परवानगी मिळावी, यासाठी डाॅ. आंबेडकर सांस्कृतिक भवन परिसर बचाव कृती समितीचे मुख्य संयोजक किशोर गजभिये यांनी याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तिद्वय अतुल चांदूरकर व महेंद्र चांदवाणी यांच्यासमक्ष सुनावणी झाली.सुरुवातीला समितीने या कार्यक्रमाकरिता २७ मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांना अर्ज सादर केला होता.
जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात पर्यटन महामंडळाला विचारणा केली होती. महामंडळाने १० एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून भवनची जमीन गरुडा कंपनीला ३० वर्षांच्या लीजवर देण्यात आल्याचे आणि सध्या ही जमीन कंपनीच्या ताब्यात असल्याचे कळविले. तसेच, २२ नोव्हेंबर २०१९ रोजी झालेल्या करारानुसार, हा कार्यक्रम घेण्यासाठी गरुडा कंपनीची परवानगी आवश्यक आहे, असे सांगितले. परिणामी, कृती समितीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. समितीच्या वतीने ॲड. प्रदीप वाठोरे व ॲड. शैलेश नारनवरे यांनी कामकाज पाहिले.