मंगेश व्यवहारे
नागपूर : समृद्धी महामार्गाच्या बाबतीत लोकांमध्ये प्रचंड एक्साइटमेंट आहे. लोकार्पणाच्या दुसऱ्याच दिवशी १२०० वाहनांनी समृद्धीवरून शिर्डीला पोहोचण्याचा प्रयत्न केला. दररोज ही संख्या वाढतच आहे. सध्या तरी या महामार्गावरील वाहनांच्या वेगावर चेक नसल्याने वेगाच्या मर्यादा ओलांडल्या जात आहेत. वाहन चालक नॉनस्टॉप प्रवास करून वेगाद्वारे वेळेशी स्पर्धा करीत आहेत; पण हा वेगवान प्रवास करताना तुमच्या वाहनांचे टायर कधीही धोका देऊ शकतात. त्यामुळे ऑटोमोबाइल तज्ज्ञांनी या प्रवासात वाहनांच्या टायरची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
ऑटोमोबाइल तज्ज्ञ निखिल उंबरकर हे अपघात टाळण्यासाठी ऑटोमोबाइल क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करीत असतात. निखिल यांनी समृद्धी महामार्गाचे परीक्षण केले आहे. महामार्गाच्या लोकार्पणानंतर नागपूर-शिर्डीच्या प्रवासाबाबत लोकांमध्ये प्रचंड एक्साइटमेंट आहे. वाहनात इंधन टाकले की ते थेट प्रवासाला निघत आहेत. पण प्रवासापूर्वी काळजी घेण्याचा सल्ला ते देतात.
- काय काळजी घ्यावी
१) लोक वाहनांच्या टायरमध्ये प्रवासापूर्वी साधी हवा भरतात. त्यात ७८ टक्के नायट्रोजन, २१ टक्के ऑक्सिजन व १ टक्का इतर वायू असतो. वाहनामध्ये ३२ ते ३३ बार हवा भरली जाते. नॉनस्टॉप वाहन चालविल्यानंतर या टायरमध्ये हवा एक्सपाँड होते. ३२ बार भरलेली हवा ४५ व ५० पर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे टायर फुटू शकतो, म्हणून नायट्रोजन हवा वाहनांच्या टायरमध्ये भरावी.
२) एवढा लांब प्रवास करताना टायरची साइड वॉल चेक केली पाहिजे. गाडीचे अलायमेंट बरोबर तपासले पाहिजे. नॉनस्टॉप वाहन चालवू नये. अन्यथा टायर आणि इंजिनवर त्याचा परिणाम होतो. १०० ते १५० किलोमीटरमध्ये १० मिनिटांचा किमान ब्रेक घ्यावा.
३) हिवाळा असल्यामुळे रस्त्याचे तापमान कमी आहे; पण उन्हाळ्यात रस्त्याचे तापमान प्रचंड वाढते. त्यातच वाहनांचा वेग व सातत्याने वाहन चालविल्यास टायरचे तापमान वाढून टायर कधीही धोका देऊ शकतो.
- लाइटवेट वाहनांनी गाठूच नये वेगाची मर्यादा
लाइटवेट असलेल्या ऑल्टो, वॅगनार, व्हॅन यासारख्या वाहनांनी किंवा ज्या वाहनाचे चाक लहान आहे. त्यांनी वेगाशी स्पर्धा करूच नये, असा सल्ला त्यांचा आहे. इनोव्हा, फॉर्च्युनर, बीएमडब्ल्यू, मर्सिडीजसारखी वाहने ताशी १२० वेगापर्यंत धावू शकतात; पण त्यापेक्षा जास्त वेगाचे धाडस करू नये. त्यातही प्रवासापूर्वी वाहनांचे टायर तपासून घ्यावे.
- महामार्गावरील अपघाताची कारणमीमांसा करीत असतानाच काही कारणे पुढे आली. त्यातील महत्त्वाचे कारण म्हणजे ५०० किलोमीटरचा प्रवास करताना वाहन चालकाने प्रवासापूर्वी टायरची तपासणी करणे महत्त्वाचे आहे. मी तर माझ्या वाहनात ‘रुफ फ्लॅप ब्रेक’ ही इमर्जन्सी ब्रेक सिस्टम इन्स्टॉल केली आहे. वाहन १२०, १४० ते १६० पर्यंत वेगाने असतानाही ब्रेक लावल्यास वाहन अनियंत्रित होत नाही. टायरची रस्त्यावरची ग्रीप सुटत नाही. ठराविक अंतरापूर्वीच गाडी थांबते. समृद्धी महामार्गावर जनावरांचे हर्डल्स असल्यामुळे सेफ्टी फिचर्स वाहनात लावा. वेगावर नियंत्रण ठेवा, वेग व वेळेशी स्पर्धा करू नका अन् सुरक्षित प्रवास करा.
-निखिल उंबरकर, ऑटोमोबाइल तज्ज्ञ