विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ : उपसंचालक कार्यालयापुढे दिले धरणे नागपूर : भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई केली नाही तर पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातर्फे कॅन्डल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिक्षण उपसंचालकांना देण्यात आला. उपसंचालक कार्यालयापुढे संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. शाळेतील पटसंख्या नसताना मान्यता देण्यात आलेल्या शाळेची विभागीय आयुक्तांनी चौकशी करून क ारवाई करण्याचे आदेश दिले, परंतु कारवाई करण्यात आलेली नाही. सामान्य शाळा घेऊन त्याचा मायनॉरिटी शाळेत समावेश केला. त्यातील शिक्षकांच्या नेमणुका मान्य केल्या. त्याचबरोबर अवैध नेमणुका, बदलीला परवानगी, पेन्शन अहवाल पाठविले जात नाही, ग्रॅच्युईटी देण्यासाठी पैसे मागतात. वैद्यकीय प्रतिपूर्ती अर्ज पडलेले आहेत. हेडमास्तरचे पद रिक्त असताना भरत नाही. यासंदर्भात विमाशितर्फे वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्या. परंतु या तक्रारींवर कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याने धरणे देण्यात आले. शिक्षण विभागात होत असलेल्या भ्रष्टाचाराचे निवेदन शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे अधीक्षक संजय नगरे यांना देण्यात आले. यावेळी विठ्ठल जुनघरे, प्रमोद रेवतकर, तेजराज राजूरकर, अरुण कराळे, लोकपाल चापले, प्रवीण भक्ते, युवराज बालपांडे, गणेश चाफले, प्रल्हाद भुसारी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर करणार कॅन्डल आंदोलन
By admin | Published: March 07, 2017 2:04 AM