नागपूर : नागपूर शहरातील गणेशपेठ बस स्थानक परिसरात अवैधरित्या रस्त्यावर उभ्या केल्या जाणाऱ्या खासगी बसेसमुळे परिसरात नेहमीच वाहतूक कोंडीची समस्या असते. नियमांची पायमल्ली करणाऱ्या खासगी बसेसवर कडक कारवाई करून बसेसचा परवाना आणि परमीट रद्द केले जावे, अशी सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानद सचिव संदीप जोशी यांनी वाहतूक पोलिसांना केली.
गणेशपेठ बसस्थानक परिसरात खासगी बसेसच्या रस्त्यावरील पार्कींगमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी व यासंदर्भात प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्र्याच्या निर्देशानुसार ‘देवगिरी’ येथे विशेष बैठक बोलाविली होती. बैठकीत पोलिस उपायुक्त झोन -३ गोरख भांबरे, माजी नगरसेवक प्रमोद चिखले, विजय चुटेले, लता काडगाये, वाहतूक पोलिस अधिकारी, प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी, मनपा वाहतूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बस स्थानक परिसरात २०० मीटर पर्यंत कुठलेही वाहन थांबवून न ठेवण्याचे आदेश आहेत. मात्र या आदेशाची पायमल्ली करून सर्रासपणे रस्त्यावरच खासगी बसेस पार्क केल्या जात आहेत. तातडीने कार्यवाही करतानाच खासगी बसेसच्या पार्कींग करिता लवकरात लवकर पर्यायी जागा देखील शोधण्यात यावी, अशाही सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.