नागपूर : तीस वर्षापासून दारुबंदी असलेल्या गडचिराेली जिल्ह्यात माेहफुलापासून दारु निर्मितच्या कारखान्याला जनविराेध वाढला आहे. दारु निर्मिती कारखान्याची परवानगर रद्द करावी म्हणून जिल्ह्यातील ८५० गावांमधून ५७,८९६ नागरिकांच्या स्वाक्षरी असलेले १००० च्यावर प्रस्ताव सरकारला सादर करण्यात आले आहेत.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व गडचिराेली जिल्हा दारुमुक्ती संघटनेचे अध्यक्ष पद्मश्री डाॅ. अभय बंग यांनी दारू निर्मिती कारखान्याचे भूमिपूजन हाेणे ही धक्कादायक बाब असल्याचे सांगत जिल्ह्यातील जनतेला अंधारात ठेवून कारखान्याची परवानगी देण्यावर आक्षेप घेतला. याविराेधात जिल्ह्यातील जनमत सरकारला कळावे म्हणून संघटनेने जिल्हाभरात अभियान राबविले. त्यानुसार जिल्ह्यातील ८४२ गावे, १२ शहरातील ११७ वार्ड, १७ आदिवासी इलाखा सभा व तालुका ग्रामसभा महासंघ व ५३ महाविद्यालयातील विद्यार्थी मिळून ५७,८९६ स्वाक्षऱ्यांचे १०३१ प्रस्ताव शनिवारी उपमुख्यमंत्री व गडचिराेली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आले.
जिल्ह्यात माेहफुलापासून दारुनिर्मितीच्या कारखान्याची परवानगी ताबडताेब रद्द करावी, महिला बचत गटाच्या माध्यमातून माेहफुलापासून इतर उपयुक्त वस्तू तयार करून विक्री करावी, गडचिराेली जिल्ह्यात दारुबंदी अधिक प्रबळ करण्यासाठी सहकार्य करावे अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. दारुबंदीचे लिखित समर्थन लाेकप्रतिनिधींनी दिले आहे. त्यामुळे वचनभंग करून दारुचे समर्थन व दारुबंदीला विराेध करणाऱ्या आमदार, खासदाराला जनता समर्थन देणार नाही, असे जाहीर करण्यात आल्याचे डाॅ. बंग यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष देवाजी ताेफा, शुभदा देशमुख, डाॅ. सतीश गाेगुलवार, सुबाेध दादा, गुरुदेव सेवा मंडळाचे डाॅ. शिवनाथ कुंभारे, भारती उपाध्याय, विजय खरवडे, लीलाताई कन्नाके आदी उपस्थित हाेते.
बंदी असूनही ५० काेटीची दारुविक्री
गडचिराेली जिल्ह्यात दारुबंदी असूनही वर्षाला ५० काेटी रुपयांची दारुविक्री झाल्याचे डाॅ. बंग यांनी स्पष्ट केले. दारुबंदी उठविलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात वर्षाला हजार काेटीची दारु विक्री हाेते तर निम्मी लाेकसंख्या असलेल्या गडचिराेली जिल्ह्यात बंदी नसती तर ५०० काेटीची दारुविक्री झाली असती, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे जिल्ह्यात निर्मिती करून बाहेर विक्री करू, असे म्हणणे चुकीचे आहे. कारखाना झाला तर जिल्ह्यात दारु पसरणार व बेकायदा विक्री वाढणार, अशी भीती आहे. कारखाना सुरु करण्याऐवजी दारुबंदी अधिक प्रबळ करा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.