कामठी/मौदा : विधानसभेच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील कामठी आणि मौदा तालुक्यात भाजपाच्या वतीने तहसील कार्यालयापुढे निदर्शने करण्यात आली. यासंदर्भात कामठी तालुका भाजपाच्या वतीने नायब तहसीलदार आर. एच. बमनोटे यांच्यामार्फत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निवेदन सादर केले.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसीचे राजकीय आरक्षण टिकविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात हवे तसे प्रयत्न केले नाही, असा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. मात्र, ओबीसीच्या हक्कासाठी विधानसभेत आवाज उठविणाऱ्या आमदारांना निलंबित करण्याची सरकारची भूमिका चुकीची असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. कामठी येथील आंदोलनात संजय कनोजिया, किशोर बेले, रमेश चिकटे, रामकृष्ण वंजारी, विजय शेंडे, राजेश देशमुख, लाला खंडेलवाल, राज हडोती, उज्ज्वल रायबोले, मंगेश यादव, सुनील खानवानी, विजय कोंडुलवार, पंकज वर्मा, विक्की बोंबले, कपिल गायधने, प्रतीक पडोळे, लालसिंग यादव आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. मौदा येथील आंदोलनात भाजपा तालुकाध्यक्ष हरीश जैन, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शरद भोयर, ओबीसी मोर्चा जिल्हा महामंत्री चांगो तिजारे, मौदा नगर पंचायत नगराध्यक्षा भारती सोमनाथे, उपनगराध्यक्ष मुन्ना चालसानी, महिला आघाडी तालुकाध्यक्ष डॉ. नीलिमा घाटोळे, तिलक दंढारे, प्रकाश येळणे, रमेश कुंभलकर आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.