गंभीर नियमभंगाचा ठपका : जिल्हाधिकारी कुर्वे यांचे आदेश नागपूर : गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्तीला बार चालविण्यास देऊन गंभीर नियमभंग केल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सोमवारी धरमपेठेतील क्लाऊड सेव्हन बार अॅन्ड रेस्टॉरंटचा परवाना रद्द केला. शंकरनगर चौकाजवळच्या क्लाऊड सेव्हन बारमध्ये २० नोव्हेंबरच्या रात्री आमदार कृष्णा खोपडे यांचा मुलगा अभिलाष आणि त्याच्या मित्रासोबत दारूच्या बिलावरून सनी बम्ब्रोतवारचा वाद झाला. त्या वादाचे पर्यवसान एकमेकांवरील हल्ला अन् बारमध्ये तसेच बाहेर वाहनांच्या तोडफोडीत झाले. एवढेच नव्हे तर आरोपी बम्ब्रोतवार आणि त्याच्या साथीदारांनी शुभम महाकाळकर या निर्दोष तरुणाची भीषण हत्या केली. या प्रकरणाने उपराजधानीत खळबळ निर्माण झाली होती. लाहोरी अन् क्लाऊड पहाटेपर्यंत बार सुरू ठेवून गुन्हेगारीस हातभार लावणाऱ्या बारमालकांना जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी या महिन्यात दिलेला हा दुसरा दणका होय. काही दिवसांपूर्वी त्यांनी वादग्रस्त लाहोरी बार अॅन्ड रेस्टॉरंटचा परवाना रद्द केला होता. त्यानंतर आता क्लाऊड सेव्हनला जिल्हाधिकारी कुर्वे यांनी दणका दिला. त्यामुळे पहाटेपर्यंत गुन्हेगारांना मद्य आणि खाद्य उपलब्ध करून देणाऱ्या बार मालकांचे धाबे दणाणले आहे.
क्लाऊड सेव्हन बारचा परवाना रद्द
By admin | Published: December 27, 2016 2:52 AM