ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 26 - गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्तीला बार चालविण्यास देऊन गंभीर नियमभंग केल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सोमवारी धरमपेठेतील क्लाऊड सेव्हन बार अॅन्ड रेस्टॉरेंटचा परवाना रद्द केला. शंकरनगर चौकाजवळच्या क्लाऊड सेव्हन बारमध्ये २० नोव्हेंबरच्या रात्री आमदार कृष्णा खोपडे यांचा मुलगा अभिलाष आणि त्याच्या मित्रासोबत दारूच्या बिलावरून सनी बंब्रोतवारचा वाद झाला. त्या वादाचे पर्यवसान एकमेकांवरील हल्ला अन् बारमध्ये तसेच बाहेर वाहनांच्या तोडफोडीत झाले. एवढेच नव्हे तर आरोपी बंब्रोतवार आणि त्याच्या साथीदारांनी शूभम महाकाळकर या निर्दोष तरुणाची भीषण हत्या केली. या प्रकरणाने उपराजधानीत खळबळ निर्माण झाली होती. बरेच दिवस या प्रकरणाची चर्चा राहिली. त्यानंतर ज्याने हा बार चालवायला घेतला तो बंब्रोतवार गुन्हेगारी वृत्तीचा असल्यामुळे पहाटेपर्यंत तो बार सुरू ठेवतो आणि तेथे नेहमीच भांडणतंटे होत असतात, असे उघडकीस आले. कोणत्याही व्यक्तीला बारचा परवाना (अनुज्ञप्ती) देताना अटी-शर्थी घातल्या जातात. त्यानुसार अनुज्ञप्तीधारकाने मुंबई विदेशी मद्य नियम १९५३ मधील नियम ४९ नुसार शासनाने प्रदान केलेली अनुज्ञप्ती स्वत: अथवा नोकरनामाधारकास व्यक्तीच्या वतीने चालविणे आवश्यक आहे. गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्तीला बार चालविण्यास दिला जाऊ शकत नाही. मात्र, क्लाऊड सेव्हन बारच्या अनुज्ञप्तीधारकाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या बंब्रोतवाराला बबार आणि रेस्टॉरेंट चालविण्यास दिले. त्यामुळे मुंबई दारूबंदी कायदा १९५३ चे कलम ४९ चे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे परवानाधारकाने गंभीर नियमभंग केल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या या भूमिकेमुळे बारमध्ये हाणामारीची होऊन त्याचे पर्यावसन एकाच्या हत्येत झाले. परिणामी या बारची अनुज्ञप्ती रद्द करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी कुर्वे यांनी आज जारी केलेल्या आदेशातून स्पष्ट केले आहे. लाहोरी अन् क्लाऊडपहाटेपर्यंत बार सुरू ठेवून गुन्हेगारीस हातभार लावणा-या बारमालकांना जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी या महिन्यात दिलेला हा दुसरा दणका होय. काही दिवसांपूर्वी त्यांनी वादग्रस्त लाहोरी बार अॅन्ड रेस्टॉरेंटचा परवाना रद्द केला होता. त्यानंतर आता क्लाऊड सेव्हनला जिल्हाधिकारी कुर्वे यांनी दणका दिला. त्यामुळे पहाटेपर्यंत गुन्हेगारांना मद्य आणि खाद्य उपलब्ध करून देणा-या बार मालकांचे धाबे दणाणले आहे.
क्लाऊड सेव्हन बारचा परवाना रद्द
By admin | Published: December 26, 2016 11:04 PM