आरटीओला प्रस्ताव पाठवा : पोलीस महासंचालक दीक्षित यांचे निर्देश नागपूर : वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांचे वाहन परवाने रद्द करण्यासंदर्भात आरटीओला प्रस्ताव पाठवा, असे निर्देश पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी दिले. शुक्रवारी सकाळी नागपुरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत पोलीस आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी उपरोक्त निर्देश दिले. चार तास चाललेल्या या बैठकीत गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस मित्रांची मदत घेण्यासही त्यांनी सांगितले. पोलिसांच्या कामात नागरिकांचे अधिकाधिक सहकार्य घेण्यात यावे. गुन्हेगारांवर नियमितपणे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी. दहशतवादी हल्ल्याचा धोका पाहता सावधगिरी बाळगण्यासही त्यांनी सांगितले. दीक्षित यांनी वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी कठोर पाऊल उचलण्यास सांगितले. नियमितपणे वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांचे वाहन परवाने रद्द करण्यासाठी आरटीओला प्रस्ताव पाठवण्याचे निर्देशही दिले. बैठकीत पोलीस आयुक्त एस.पी. यादव, सहआयुक्त संतोष रस्तोगी, अपर आयुक्त सुहास वारके, रंजन शर्मा, उपायुक्त अभिनाश कुमार, ईशु सिंधू, शैलेश बलकवडे, कलासागर, श्रीधर, राजकुमार, स्मार्तना पाटील, रवींद्र परदेशी उपस्थित होते. दीक्षित सायंकाळी दिल्लीला रवाना झाले. ते रविवारी पुन्हा परतणार आहेत. (प्रतिनिधी)
वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांचे परवाने रद्द करा
By admin | Published: July 23, 2016 3:12 AM