ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लोकमत सखी मंचचे आयोजन नागपूर : लोकमत सखी मंचच्या संस्थापिकाज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नि:शुल्क कॅन्सर रोग तपासणी, रोगनिदान व जनजागृती व्याख्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर आज मंगळवारी सकाळी १० वाजता जैन सहेली मंडळाच्या श्रीमती ज्योत्स्ना दर्डा मेमोरियल वूमन डेव्हलपमेंट सेंटर, इरा इंटरनॅशनल शाळेजवळ, एमआयडीसी, बुटीबोरी येथे होईल.शिबिराचे आयोजन लोकमत सखी मंच, कॅन्सर रिलीफ सोसायटीद्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रिजनल कॅन्सर हॉस्पिटल व रिसर्च सेंटर आणि नागपूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. ‘कॅन्सर होऊ शकतो कॅन्सल’ या नावाखाली आयोजित शिबिरात महिलांची सामान्य आरोग्य तपासणीसोबतच ‘स्तनाचा कॅन्सर’ व ‘गर्भाशयाचा कॅन्सर’ची तपासणी करण्यात येईल. शिबिरात प्रथम येऊन नोंदणी करणाऱ्या ५०० महिलांची तपासणी केली जाणार आहे.या शिबिरात सेंट्रल इंडिया कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटचे कॅन्सर रोगतज्ज्ञ डॉ. अजय मेहता आणि डॉ. सुचित्रा मेहता महिलांची तपासणी करतील. तपासणी पूर्वी हे दोन्ही तज्ज्ञ कर्करोग कसा ओळखावा, त्यासाठी कोणत्या चाचण्या कराव्या, कर्करोग कुणालीही होऊ शकतो, त्या आजाराची संभाव्य लक्षणे, त्याबाबत कोणती काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.या शिबिरात तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलची चमू तपासणी करेल. डॉ. ललित गांधी यांच्या सहकार्याने कोल्हापूर येथून विशेष तपासणी वाहन येणार आहे. यात कॅन्सरचे लक्षणे आढळून येणाऱ्या महिलांची अॅडव्हान्स चाचणी करण्यात येईल. स्व. ज्योत्स्ना दर्डा या लोकमत सखी मंचसोबतच जैन सहेली मंडळाच्याही संस्थापिका आहेत. त्यांनी आयुष्यभर सेवाभावी कार्य केले. त्यामुळे लोकमत सखी मंचच्यावतीने वर्षभर अनेक सेवाभावी कार्य केले जातात. या शिबिराला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेन्द्र सवाई आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहतील. महिलांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन लोकमत सखी मंचने केले आहे. शिबिराच्या अधिक माहितीसाठी हेमलता देशमुख ८८०५५२८६१७, नीलिमा धामंडे ९८८१७५८७७५, लोकमत सखी मंच कार्यालय लोकमत भवन रामदासपेठ ९९२२२०००६३ किंवा २८२९३५५ या क्रमांकावर संपर्क साधावा.
बुटीबोरीमध्ये कॅन्सर तपासणी व रोगनिदान शिबिर आज
By admin | Published: March 17, 2015 1:41 AM