कार्यकर्त्यांशी चर्चा करून ठरविणार उमेदवार : पटोलेंनी घेतला तीन मतदारसंघांचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 09:50 PM2021-07-24T21:50:04+5:302021-07-24T21:52:31+5:30
Nana Patole काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी नागपुरातील काँग्रेसमध्ये असलेल्या गटबाजीवर थेट भाष्य करणे टाळले. मात्र महापालिकेच्या येत्या निवडणुकीत कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच उमेदवार ठरविले जातील, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे गटबाजीला खतपाणी घालणाऱ्या नेत्यांना इशारा दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी नागपुरातील काँग्रेसमध्ये असलेल्या गटबाजीवर थेट भाष्य करणे टाळले. मात्र महापालिकेच्या येत्या निवडणुकीत कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच उमेदवार ठरविले जातील, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे गटबाजीला खतपाणी घालणाऱ्या नेत्यांना इशारा दिला. सोबतच कोणत्याही परिस्थितीत महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवायचा आहे, असा संकल्प सोडत कार्यकर्त्यांनी त्यासाठी कामाला लागण्याचे आवाहनही त्यांनी केले. महापालिका निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी दक्षिण-पश्चिम, दक्षिण व पश्चिम नागपूर अशा तीन मतदारंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वतंत्र बैठक घेतली. तीत प्रदेश कार्याध्यक्ष व विदर्भाचे प्रभारी चंद्रकांत हंडोरे, शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे, आ. ॲड. अभिजित वंजारी, प्रदेश महासचिव प्रफुल्ल गुडधे, विशाल मुत्तेमवार, उमाकांत अग्निहोत्री, सचिव अतुल कोटेचा, मुजीब पठाण आदी उपस्थित होते. बैठकीत पटोले यांनी निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. बुथ स्तरापर्यंत संपर्क वाढवा, महागाईच्या प्रश्नावर जनतेत जावून जनजागृती करा, अशा सूचना त्यांनी केल्या.
नितीन राऊत अनुपस्थित, खदखद कायम
- प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बोलाविलेल्या या तीनही बैठकीला पालकमंत्री नितीन राऊत उपस्थित नव्हते. विशेष म्हणजे प्रदेश काँग्रेसने या बैठकांबाबत जारी केलेल्या पत्रकात राऊत हे उपस्थित राहतील, असे नमूद आहे. मात्र, राऊत यांच्या अनुपस्थितीमुळे पुन्हा एकदा काँग्रेसमधील अंतर्गत खदखद शमलेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
बैठकीतूनच मनपा आयुक्तांना फोन
दक्षिण-पश्चिमचा आढावा सुरू असताना कार्यकर्त्यांनी लसीकरण केंद्रांवर भाजपचे झेंडे लावले असल्याची माहिती दिली. याची दखल घेत पटोले यांनी थेट महापालिका आयुक्तांना फोन करून यासंदर्भात तक्रार केली.
काँग्रेसचाच महापौर : ठाकरे
वॉर्ड पद्धतीच्या निवडणुकीत काँग्रेसला नेहमीच चांगले यश मिळाले आहे. शहर काँग्रेसने बूथ पातळीपर्यंत संघटन बांधणी केली असून विविध आघाड्या व सेलची पुनर्रचना करण्यात आली आहे. येत्या निवडणुकीत काँग्रेसचा महापौर झालेला दिसेल, असा दावा शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी केला.