२७ टक्के उपस्थिती : १९ हजार उमेदवार गैरहजरनागपूर : रेल्वे रिक्रूटमेंट सेलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ग्रुप डीच्या परीक्षेकडे सलग तिसऱ्या आठवड्यातही उमेदवारांनी पाठ फिरविली असून केवळ २७.९९ टक्के विद्यार्थीच परीक्षेला उपस्थित राहिल्याचे अधिकाऱ्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे.रेल्वे प्रशासनाने ग्रुप डीच्या पदासाठी उमेदवारांनी अर्ज मागविले होते. रेल्वे प्रशासनाला एकूण २६ हजार ५३८ अर्ज प्राप्त झाले होते. रविवारी रेल्वे रिक्रूटमेंट सेलच्यावतीने नागूर शहरातील ४७ केंद्रावर ही परीक्षा घेतली. यात २६ हजार ५३८ उमेदवारांपैकी फक्त ७ हजार ४२७ उमेदवारच परीक्षेला हजर होते. उर्वरित १९ हजार १११ उमेदवारांनी परीक्षेकडे पाठ फिरविली. परीक्षेसाठी शहरातील शाळेचे १ हजार ३६५ शिक्षकांनी रेल्वेच्या ८६६ कर्मचाऱ्यांनी तसेच रेल्वेचे ६२ अधिकारी तर रेल्वे सुरक्षा दलाच्या ७५ जवानांनी ही परीक्षा पार पाडली. परीक्षेत कुठलाही गैरप्रकार झाला नसल्याचे अधिकाऱ्यांनी कळविले आहे. ग्रुप डीच्या पदासाठी रेल्वे रिक्रूटमेंट सेलच्यावतीने चार टप्यात ही परीक्षा घेण्यात येत आहे. पहिल्या तीन टप्यात ७५ टक्के उमेदवारांनी परीक्षेकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. रेल्वेच्या वतीने अर्ज मागविण्यात आल्यानंतर परीक्षा घेण्यासाठी १ ते २ वर्षाचा कालावधी लावण्यात येतो. त्यामुळे या कालावधीत बहुतांश उमेदवार दुसरा पर्याय निवडतात. त्यामुळे रेल्वेच्या परीक्षेला प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती रेल्वे वर्तुळातील जाणकारांनी दिली आहे. (प्रतिनिधी)
रेल्वेच्या परीक्षेकडे उमेदवारांनी फिरवली पाठ
By admin | Published: November 17, 2014 1:03 AM