विधानसभेसाठी लवकर निश्चित करावा उमेदवार; काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा सूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 12:11 PM2019-06-10T12:11:52+5:302019-06-10T12:12:13+5:30
लोकसभा निवडणुकांतील पराभवामुळे निराश झालेल्या काँग्रेसने आता विधानसभेची तयारी सुरू केली आहे. याअंतर्गतच मुंबईत प्रदेश काँग्रेस कार्यालयात जिल्हानिहाय आढावा बैठकांत नागपूर जिल्ह्यासंदर्भात मंथन झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणुकांतील पराभवामुळे निराश झालेल्या काँग्रेसने आता विधानसभेची तयारी सुरू केली आहे. याअंतर्गतच मुंबईत प्रदेश काँग्रेस कार्यालयात जिल्हानिहाय आढावा बैठकांत नागपूर जिल्ह्यासंदर्भात मंथन झाले. नागपूर जिल्ह्यातील १२ जागांबाबत सविस्तर चर्चा झाली. जर विधानसभा निवडणुकांत चांगली कामगिरी करायची असेल तर सर्वच जागांवर लवकरात लवकर उमेदवार निश्चित करावा, अशी भूमिका यावेळी शहर व जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.
काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या पुढाकारातून बैठकांचे सत्र आयोजित करण्यात आले. या बैठकीत लोकसभा निवडणुकांमधील अपयश, ‘डॅमेज कंट्रोल’सोबतच येणाºया काळातील रणनीतीवर चर्चा करण्यात आली. विविध मुद्यांवर स्थानिक पदाधिकाऱ्यांचे मतदेखील जाणून घेण्यात आले. शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकांचा अहवाल मांडला. त्यासोबत शहरातील सहा विधानसभा मतदारसंघात निवडणुकांच्या दृष्टीने आखण्यात आलेल्या आराखड्याबाबत माहिती दिली. या जागांवर लोकसभेतील कामगिरीवरदेखील त्यांनी प्रकाश टाकला. उत्तर नागपुरात काँग्रेसला मताधिक्य मिळाले. याचे श्रेय दुसऱ्या फळीतील नेता व कार्यकर्त्यांना आहे. निवडणुकांत यश मिळवायचे असेल तर लवकरात लवकर उमेदवारांची नावे घोषित व्हावी. जर असे झाले तर उमेदवाराची मानसिक तयारी होते व ते विविधांगी विचार करून मतदारांपर्यंत पोहोचू शकतात, असा सूर या बैठकीत होता. जर पक्ष उमेदवारांच्या नावाची घोषणा करू शकत नसेल तर कमीतकमी उमेदवाराला खासगीत निरोप द्यावा, असेदेखील एका पदाधिकाऱ्याने मत व्यक्त केले.
पटोले, जिल्हाध्यक्ष अनुपस्थित
बैठकीत काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे, रामटेक लोकसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार किशोर गजभिये, प्रदेश सचिव उमाकांत अग्निहोत्री, अतुल लोंढे, अनंतराव घारड, अमोल देशमुख, हुकूमचंद आमधरे, माजी आमदारएस. क्यू. जमा इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. मात्र जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, नागपूर मतदारसंघातील पराभूत उमेदवार नाना पटोले हे अनुपस्थित होते. मुळक यांच्या अनुपस्थितीतच ग्रामीण भागातील सहा जागांवर चर्चा झाली.