लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: उपराजधानीसह विदर्भात अनेक ठिकाणी उमेदवारांनी सकाळच्या प्रहरी मतदान करण्यास पसंती दिल्याचे आढळून आले.गोंदियात खा. प्रफुल्ल पटेल आणि वर्षा पटेल यांनी नमाद महाविद्यालयातील मतदान केंद्रावर मतदान केले. वर्धा येथील भाजप उमेदवार डॉ. पंकज भोयर यांनी आपल्या कुटुंबियांसह वसंत प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूर मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार डॉ. सतीश वारजूकर यांनीही सकाळी मतदान केले.
नागपूर जिल्ह्यात उमरेड मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार राजू पारवे यांनी सपत्नीक मतदान केले.नागपूर जिल्ह्यात विधानसभेच्या १२ जागा आहेत. यापैकी सद्यस्थितीत भाजपकडे ११ तर काँग्रेसकडे एक जागा आहे. आमदार आशिष देशमुख यांनी पूर्वीच भाजप सोडली. उरलेल्या १० पैकी ८ आमदारांना भाजपने पुन्हा संधी दिली आहे, तर उर्वरित ४ जागांवर नवे चेहरे रिंगणात उतरविले. काँग्रेसने मात्र त्यांच्या वाट्याला आलेल्या १० पैकी ७ जागी नवे उमेदवार दिले आहेत. तर राष्ट्रवादीनेही हिंगणा येथील जागेवर उमेदवार बदलला आहे.