वाडी : नगर परिषदेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र भरण्याच्या प्रक्रियाला सुरुवात करण्यात आली आहे. २५ मार्चपासून आजवर केवळ एक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. उमेदवारी अर्ज ‘आॅनलाईन’ पद्धतीने भरावयाचा असल्याने या पद्धतीला उमेदवार वैतागले असल्याचे दिसून येत आहे. वाडी नगर परिषदेची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक असल्याने या निवडणुकीला मतदार आणि उमेदवारांच्या दृष्टीने विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यावेळी नामनिर्देशनपत्र परंपरागत पद्धतीने भरण्याऐवजी ते ‘आॅनलाईन’ पद्धतीने भरावयाचे असल्याने उमेदवारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येते. ही निवडणूक प्रभाग ऐवजी वॉर्ड पद्धतीने घेण्यात येणार आहे. यासाठी वाडी येथे २५ वॉर्डांची निर्मिती करण्यात आली आहे. येथील वॉर्डनिहाय आरक्षण पूर्वीच जाहीर करण्यात आले. त्यात काही प्रस्थापित नेत्यांचा हिरमोड झाल्याने त्यांनी सोईचा वॉर्ड शोधमोहीम सुरू केली केली. दुसरीकडे विविध राजकीय पक्षांची उमेदवार शोधमोहीम सुरू आहे. वाडी नगर परिषदेत एकूण ४३ हजार ९२० मतदार आहेत. यात २३ हजार ६३ पुरुष व १९ हजार ८५३ महिला मतदारांचा समावेश आहे. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशान्वये वाडी येथील वॉर्डनिहाय तात्पुरत्या मतदार याद्या प्रकाशित करण्यात आल्या. यावर आक्षेप नोंदविण्याची सूचनाही करण्यात आली. (प्रतिनिधी)२२ एप्रिल रोजी मतदानवाडी नगर परिषदेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २२ एप्रिल रोजी मतदान केले जाणार आहे. २५ ते ३१ मार्च दरम्यानच्या काळात उमेदवारांना नामनिर्देशन पत्रांचे वाटप केले जाणार असून, ते स्वीकारले जातील. प्राप्त उमेदवारी अर्जांची १ एप्रिल रोजी छाननी करून त्याच दिवशी पात्र उमेदवारांची यादी प्रकाशित केली जाईल. २३ एप्रिल रोजी मतमोजणी केली जाईल.
‘आॅनलाईन’ पद्धतीला उमेदवार वैतागले
By admin | Published: March 30, 2015 2:31 AM