कुख्यात रंगारी हा सराईत गुन्हेगार असून, परिमंडळ चारचे उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी नागपुरातून तडीपार केले होते. त्याला नागपूर जिल्ह्याबाहेर नेऊन सोडण्यात आले होते. मात्र, आरोपी रंगारी नागपुरात परतला आणि गुन्हेगारीतही सक्रिय झाला होता. गेल्या काही दिवसांपासून त्याने गांजाची तस्करी सुरू केली होती. गुन्हे शाखेचे पथक शनिवारी दुपारी सक्करदऱ्यात गस्त करीत असताना त्यांना आरोपी रंगारी संशयास्पद अवस्थेत मोटारसायकलने जाताना दिसला. त्याला थांबवून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे दोन किलो, २६० ग्राम गांजा, एक मोबाइल, धारदार चाकूही आढळला. तो जप्त करून पोलिसांनी त्याला गांजा तस्करीच्या आरोपात अटक केली.
गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या अंमलीपदार्थ विरोधी पथकाचे निरीक्षक सारीन दुर्गे, सहायक निरीक्षक सुरेश सुरोशे, बद्रीनारायण तांबे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.