नागपूर : जवळपास २४ लाख रुपयांच्या गांजासह अटक केलेल्या टॅक्सीचालकाने कुटुंबीयांच्या पालनपोषणासाठी तस्करी करीत असल्याचे सांगितले आहे. तो दिल्लीच्या चंदू नावाच्या व्यक्तीने सांगितल्यानुसार तस्करी करण्यात सहभागी झाला आहे. पोलिसांनी चंदूची शोधमोहिम सुरू केली आहे. गुन्हे शाखेच्या एनडीपीएस सेलने आरोपी अजय भट्टला बुधवारी न्यायालयात सादर करून ५ एप्रिलपर्यंत ताबा मिळविला आहे.
गुन्हे शाखेच्या एनडीपीएस सेलने मंगळवारी रात्री सोमबाजार, विकासनगर, दिल्ली येथील ३० वर्षीय अजय भट्टला १६० किलो गांजासह पकडले होते. अजय विशाखापट्टणमहून कारमध्ये गांजाची खेप घेऊन दिल्लीला जात होता. याची माहिती मिळताच एनडीपीएस सेलने पारडी पुलाजवळ त्याला अटक केली होती. अजय दिल्ली येथील चंदू नामक व्यक्तीच्या इशाऱ्यावरून तस्करी करीत असल्याचे सांगत आहे. चंदूने त्याला विशाखापट्टणम पाठविले होते. त्या एका खेपच्या बदल्यात २५ हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. अजयच्या कुटुंबात बहीण आणि आई-वडील आहेत. त्याच्या भरवशावर कुटुंबाचा खर्च चालतो. लॉकडाऊन आणि शेतकरी आंदोलनामुळे दिल्लीचा टॅक्सी व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे अजय गांजा तस्करीसाठी तयार झाला. दिल्लीचा चंदू आणि त्याच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतरच रॅकेटची खरी माहिती पुढे येणार आहे.