नागपूर : आरपीएफच्या पथकाने धावत्या रेल्वेत गांजा तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला. ही कारवाई पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसमध्ये करण्यात आली. कारवाईत गांजाचे एकूण १६ बंडल जप्त करण्यात आले असून, या प्रकरणी इतवारी लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दक्षिण-पूर्व मध्य रेल्वे मोतीबाग आणि गुन्हे शाखेच्या संयुक्त पथक ०२८४३ पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसमध्ये स्फोटक वस्तूंची तपासणी करीत होते. भंडारा ते नागपूरदरम्यान धावत्या रेल्वेत तपासणी सुरू असताना सहाय्यक उपनिरीक्षक एम. अहमद यांना कळमना रेल्वेस्थानकाजवळ एस-४ कोचमध्ये शौचालयाच्या आत एक खाकी रंगाचे टेप गुंडाळलेले बंद पाकीट आढळले. खबरदारी म्हणून श्वान पथकाच्या मदतीने बंद पाकिटाची तपासणी करण्यात आली. श्वानाने घातपात करणारी वस्तू नसल्याचा इशारा दिला. त्यानंतर पाकिटाची तपासणी केली असता त्यात उग्र वास येत होता. पाकीट उघडून पाहिले असता त्यात गांजा असल्याचे आढळले. बंद पाकिटाबाबत कोचमधील प्रवाशांना विचारपूस केली असता त्यावर कोणीही हक्क सांगितला नाही. या घटनेची सूचना आरपीएफ निरीक्षक विकास कुमार आणि राकेश कुमार यांना देण्यात आली. अहमदाबाद एक्स्प्रेस दुपारी २.३० वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर आल्यानंतर आरपीएफचे उपनिरीक्षक विवेक मेश्राम, के. के. निकोडे यांनी एस-४ कोचमध्ये जाऊन एकूण १६ बंडल जवानांच्या मदतीने खाली उतरविले. सहाय्यक सुरक्षा आयुक्त एस.डी. देशपांडे यांच्या उपस्थितीत एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत कारवाई करण्यात आली. १६ बंडलमध्ये ३२ किलो ९७५ ग्रॅम गांजा मिळाला. त्याची किंमत तीन लाख २९ हजार ७५० रुपये आहे. संपूर्ण मुद्देमाल कायदेशीर कारवाईनंतर इतवारी लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला. ही कारवाई दपूम रेल्वेचे सुरक्षा आयुक्त पंकज चुघ यांच्या मार्गदर्शनात विनेक मेश्राम, एस. एस. सिडाम, एस. बी. मेश्राम, बी. हलमारे आणि डॉग हॅन्डलर एस. डी. गवई यांनी केली.
.............