लाेकमत न्यूज नेटवर्क
बुटीबाेरी : पाेलिसांच्या पथकाने नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील बाेरखेडी (रेल्वे) शिवारातील टाेल नाक्याजवळ केलेल्या कारवाईमध्ये गांजाची अवैध वाहतूक करणारी कार पकडली. यात कारचालकास ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून ६ लाख ९५ हजार रुपये किमतीच्या गांजासह एकूण १२ लाख ६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी (दि. ३) करण्यात आली.
बुटीबाेरी पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना चंद्रपूरहून नागपूरच्या दिशेने गांजाची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी या मार्गावरील बाेरखेडी (रेल्वे) शिवारातील टाेल नाक्याजवळ नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली. यात पाेलिसांनी नागपूरच्या दिशेने जात असलेली डीएल-०७/सीजी-४३४१ क्रमांकाची टाेयाेटा कार थांबवून झडती घेतली. त्यांना कारमधील प्लास्टिकच्या वेष्टनात ६९.५०० किलाे गांजा आढळून आला.
ती गांजाची अवैध वाहतूक असल्याचे स्पष्ट हाेताच, पाेलिसांनी कारचालकास ताब्यात घेत गांजा व कार जप्त केली. या कारवाईमध्ये ६ लाख ९५ हजार रुपये किमतीचा गांजा, पाच लाख रुपयाची कार, १० हजार रुपयाचा माेबाईल हॅण्डसेट आणि एक हजार रुपये राेख असा एकूण १२ लाख ६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार ओमप्रकाश काेकाटे यांनी दिली. ताब्यात घेतलेल्या कारचालकाचे नाव कळू शकले नाही.
याप्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी एनडीपीएस ॲक्ट कलम २०, २२ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक सतीश साेनटक्के करीत आहेत. ही कारवाई सहायक पाेलीस निरीक्षक माणिक चाैधरी, उपनिरीक्षक आशिष माेरखेडे, संजय भारती, कुमुदिनी पाचाेडे, मिलिंद नांदूरकर, संजय बांते, सतेंद्र रंगारी, राजू कापसे, नारायण भाेयर, राकेश तालेवार, विवेक गेडाम, पंकज ढाेके, विनायक सातव, संजय वैद्य यांच्या पथकाने केली.