नागपूर - तेलंगणातून महाराष्ट्रात आणण्यात आलेला सुमारे एक कोटी रुपये किंमतीचा गांजा नागपूर ग्रामीण पोलिसांनी शनिवारी जप्त केला. रात्रीपर्यंत या संबंधाने कारवाईची प्रक्रिया सुरू होती.
विजयवाड्यातील (आंध्रप्रदेश) एका ट्रान्सपोर्टरकडे चंदीगड (पंजाब)च्या व्यावसायिकाला ४५ लाखांची कॉफी पोहवायची होती. ती ट्रकमध्ये भरून घेतल्यानंतर शुक्रवारी सकाळी नागपूरकडे ट्रक निघाला. मध्ये खम्मम (तेलंगणा) जवळ गांजा तस्करांनी कॉफीच्या मध्ये सुमारे ११०५ किलो गांजा लपवला. त्यानंतर हा ट्रक पुढे निघताच नागपूर ग्रामीण पोलिसांच्या टिपरने गांजाची मोठी खेप निघाल्याचे सांगितले. त्यावरून पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त अधीक्षक राहुल माकणिकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल जिट्टावार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कारवाईची तयारी केली. शनिवारी सकाळी हा ट्रक बुटीबोरी परिसरात येताच पोलीस निरीक्षक जिट्टावार आणि बुटीबोरीचे ठाणेदार ओमप्रकाश कोकाटे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी हा ट्रक अडवला. ट्रकमध्ये पाहणी केली असता कॉफीच्या मध्ये गांजा दडवून ठेवल्याचे आढळले. त्यामुळे तो ट्रक पोलीस ठाण्यात आणण्यात आला.आरोपी निश्चिंत नाहीट्रकमध्ये आढळलेल्या गांजाची किंमत १ कोटी, ५० हजार रुपये असून दरम्यान, ट्रकची किंमत २० ते २५ लाख रुपये आहे. तसेच त्यात ४५ लाखांची कॉफीही आहे. पोलिसांनी हा सुमारे पावणेदोन कोटींचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, या गांजा तस्करीत ट्रकचालक, क्लिनरसह नेमके किती आरोपी आहे, ते रात्री ११ पर्यंत स्पष्ट झाले नव्हते. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तत्पूर्वी, पोलीस त्या सर्वांची भूमीका तपासून बघत आहेत. रविवारी सकाळपर्यंत यासंबंधाने निश्चिंत माहिती स्पष्ट होईल, असे पोलीस सांगत होते.