ब्रिटिश सैन्याने कामठीत बस्तान मांडल्यानंतर त्यांनी त्यांच्या आध्यात्मिक प्रथा कायम ठेवल्या. यासाठी कामठी कॅन्टोन्मेंटच्या प्रवेशद्वारासमोर १८३३ मध्ये सेंट्रल प्रोव्हिंसचे मुख्य आयुक्त कर्नल एलियॉट यांनी ऑल सेंट चर्चची स्थापना केली. हा चर्च आता ‘क्राईस्ट चर्च’ म्हणून ओळखला जातो. याची डिझाईन रॉयल बंगालचे अभियंता कर्नल हार्ले मॅक्सवेल यांनी तयार केली होती. ब्रिटिश सैन्यातील ब्रिटिश व युरेशियन सदस्यांच्या गरजेसाठी स्थापन करण्यात आले होते.
कॉन्सेप्शन चर्च (आरसी चर्च):
या चर्चची स्थापना १८४६ मध्ये फादर लॉवोरेल अॅन्ड कंपनी पायोनियर यांनी केली. ते फ्रेंच मिशनरीज होते आणि मिशनरीज ऑफ सेंट फ्रान्सिस डि-सेल्स म्हणून ओळखले जात होते. गोराबाजार परिसरात प्रवेश करताना हा चर्च लागतो.
दीड शतकाचा ठेवा असलेला महादेव घाट
कन्हान नदीच्या काठावर वसलेल्या महादेव घाटाला १५० वर्षांचा इतिहास आहे. त्यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरात राहणारे हिंदू धर्मीय सैनिक आणि परिसरात राहणाऱ्या ग्रामस्थांसाठी येथील महादेव मंदिर आध्यात्मिक स्थळ राहिले आहे. दरवर्षी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात या मंदिरात गणेशोत्सव आणि दुर्गा उत्सव साजरा केला जात होता.
कामठी क्लब आणि कस्तुरचंद डागा
आर्म फोर्सच्या अधिकाऱ्यांच्या मनोरंजनासाठी १८७७ साली कामठी क्लबची स्थापना करण्यात आली. १९१२ साली कस्तुरचंद डागा यांनी बिल्डिंग क्रमांक ७७ या क्लबसाठी दान केली होती. कामठी क्लब कन्हान नदीच्या काठावर जीएलआर सी. नं. २५२ मध्ये ५.४० एकरात विस्तारलेला आहे.
ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या समाध्या
कामठी कॅन्टोन्मेंट परिसरात असलेली स्मशानभूमी प्रोटेस्टंट चर्च आणि आरसी चर्च सदस्य अशा दोन भागांत विभागली आहे. ही स्मशानभूमी क्राईस्ट चर्च बिल्डिंगच्या समोर आहे. पहिल्या विश्वयुद्धातील मृत ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या १०० समाध्या या स्मशानभूमीत आजही आहेत.
इतिहासाच्या पाऊलखुणा जपणारा माल रोड
माल रोड हा कामठी कॅन्टोन्मेंटमधील महत्त्वाचा मार्ग आहे. याची लांबी ४.३ किलोमीटर असून त्याच्या दोन्ही बाजूला ब्रिटिशकालीन बंगल्यांचा दर्शनी भाग पाहावयास मिळतो. हा रस्ता पूर्ण लांबीपर्यंत कन्हान नदीच्या समांतर आहे.
कॅन्टोन्मेंटचे सुरक्षा कवच कन्हान नदी
कामठी कॅन्टोन्मेंटच्या उत्तर दिशेला ४ मैलपर्यंत कन्हान नदीचा विस्तार आहे. कॅन्टोन्मेंटची नैसर्गिक सीमा म्हणूनही तिची ओळख आहे. कन्हान नदी ही नागपूर शहर, कामठी कॅन्टोन्मेंट व आसपासच्या गावांसाठी पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत आहे. कॅन्टोन्मेंट एरियामध्ये असलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पात याच नदीतून पाणीपुरवठा केला जातो. या नदीमुळे कॅन्टोन्मेंटला नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झाले आहे.
ब्रिटिशकालीन फाशी यार्ड
कामठी कॅन्टोन्मेंट परिसरात ब्रिटिशांनी आरमार उभारल्यानंतर नागपूरचे राज्य ब्रिटिश साम्राज्यात विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. या काळात ब्रिटिशांविरुद्ध बंड करणारे आणि ब्रिटिश कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी कॅन्टोन्मेंट परिसरात फाशी यार्डही उभारण्यात आले होते. येथे कुणाला फाशी देण्यात आली होती, याची अधिकृत माहिती सध्या उपलब्ध नाही.
ब्रिटिशांची बाजारपेठ गोराबाजार
कामठी कॅन्टोन्मेंट परिसरातील गोराबाजार ही ब्रिटिशांची मुख्य बाजारपेठ होती. येथील सराफा ओळ त्या काळात प्रसिद्ध होती. नंतरच्या काळात हा सराफा बाजार नागपुरातील इतवारी, मध्यप्रदेशातील छिंदवाडा आणि छत्तीसगढ येथील राजंदगाव येथे गेला. छिंदवाडा येथे आजही चुन्नीलाल चंपालाल ज्वेलर्सची ‘कामठीवाले ज्वेलर्स’ म्हणून भव्य शोरूम आहे. गोराबाजार येथे ब्रिटिश अधिकारी आणि जवान त्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंची खरेदीही करायचे. ही खरेदी करताना ब्रिटिश अधिकारी या परिसरात घोड्यावर सवारी करायचे, अशी आठवण कामठी छावणी परिषदेचे माजी उपाध्यक्ष युगचंद छल्लानी यांनी सांगितले.