जगदीश जोशी
नागपूर : गृहमंत्र्यांचे होमटाऊन असल्यामुळे नागपूर गुन्ह्यांसाठी नेहमीच चर्चेत राहते. येथे घडणारी लहानशी घटनाही नेत्यांमधील भांडणाचे कारण ठरते. गेल्या सहा वर्षात अनेकदा उपराजधानीवर क्राईम कॅपिटलचा डाग लागला. परंतु, सध्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी कर्तबगार अधिकाऱ्यांच्या हातात आहे. त्यांनी २०२१ मध्ये नागपूरला गुन्हे व भ्रष्टाचारमुक्त शहर करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
अमितेशकुमार, पोलीस आयुक्त.
नागपूरवासीयांना भीतीमुक्त करणे नवीन वर्षाचे लक्ष्य आहे. खून व प्राणघातक हल्ल्याच्या घटना चिंतेची बाब आहे. अशा घटना थांबविण्यासाठी प्रत्येक प्रयत्न केले जातील. अवैध धंदे व बेकायदेशीर हालचाली होऊ दिल्या जाणार नाहीत. महिलांवरील गुन्ह्यांची संख्या घटली आहे. येणाऱ्या वर्षात असे गुन्हे करणाऱ्यांना शंभरवेळा विचार करावा लागेल अशी व्यवस्था केली जाईल. पोलीस अथक परिश्रम घेत असतानाही आर्थिक व सायबर गुन्हे वाढत आहेत. त्यावर नियंत्रण आणण्याकरिता प्रभावी योजना आखली जाईल. नागरिक वाहतूक नियमांबाबत गंभीर नाहीत. त्याविषयी नागरिकांमध्ये जागृती घडवून आणली जाईल.
निर्मला देवी, अधीक्षक, सीबीआय नागपूर.
भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी सीबीआयच्या रडारवर आहेत. सीबीआय नागपूर शाखेंतर्गत ११ जिल्हे येतात. या जिल्ह्यांमधील केंद्र सरकारचे सर्व विभाग सीबीआयच्या कार्यक्षेत्रात येतात. यापैकी अनेक विभागांमध्ये सामान्य नागरिकांना विविध कामे करण्यासाठी जावे लागते. दरम्यान, त्यांना भ्रष्टाचाराला तोंड द्यावे लागते. बरेचदा यासंदर्भात तक्रार केली जात नाही. त्यामुळे नागरिकांना याविषयी जागृत केले जाईल. निडर होऊन भ्रष्टाचाराची तक्रार करण्यासाठी प्रेरित केले जाईल. २०२० मध्ये केवळ एका प्रकरणाची नोंद झाली. २०२१ मध्ये नागरिकांच्या मदतीने चांगली कामगिरी करण्याचे प्रयत्न केले जातील.
रश्मी नांदेडकर, अधीक्षक, एसीबी.
कोरोना संक्रमणामुळे सापळा कारवाई व बेहिशेबी मालमत्तांच्या प्रकरणांत घट झाली. नवीन वर्षामध्ये सर्व अडथळे बाजूला करून भ्रष्टाचाऱ्यांना धडा शिकवला जाईल. काही विभाग भ्रष्टाचाराकरिता नेहमी चर्चेत असतात. त्यांची नस एसीबीला माहिती आहे. एसीबी अशा विभागाशी संबंधित तक्रारी गंभीरतेेने घेऊन भ्रष्टाचाऱ्यांना गजाआड करण्याची योजना तयार करते. परंतु, अनेकदा विविध कारणांमुळे कारवाईत यश मिळत नाही. त्यावर प्रभावी उपाय शोधून काढला जाईल. पारदर्शी कामकाजामुळे एसीबीचा मान वाढला आहे. ही प्रतिमा कायम जपली जाईल.
राकेश ओला, पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण.
ग्रामीण पोलिसांकरिता २०२० हे वर्ष उत्तम राहिले. गुन्हे व अपघातांची संख्या खूप कमी झाली. नवीन वर्षात पुन्हा चांगली कामगिरी करायची आहे. चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी ग्रामीण पोलिसांना सक्रिय केले जाईल. अपघातांमध्ये नागरिकांना विनाकारण प्राण गमवावे लागतात. वाहतूक नियमांचे पालन करून अपघात टाळले जाऊ शकतात. यासंदर्भात जनजागृती केली जाईल.